बदललेली जीवनशैली हे सध्या लठ्ठपणाचे महत्त्वाचे कारण आहे. चुकीचा आहार, अपुरी झोप आणि ऑफिसमध्ये एकाच जागेवर बसून काम, व्यायामाचा अभाव यांमुळे लठ्ठपणा कमी होण्याचे नावच घेत नाही. लठ्ठपणामुळे मग उच्च रक्तदाब, मधुमेह आणि आरोग्याच्या इतर समस्याही उद्भवतात. मात्र असे होऊ नये म्हणून इतर गोष्टींबरोबर आहाराविषयी जागरुक असणे आवश्यक आहे. यामध्ये घरातील महिलेचा सहभाग अतिशय महत्त्वाचा असतो. आपल्या स्वयंपाकगृहात कोणत्या गोष्टी तयार होतात आणि आपल्या खाण्यापिण्याच्या पद्धती कशा आहेत यावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. पाहूयात स्वयंपाकघरात काय असायला हवे….

फळे आणि भाज्या असायलाच हव्यात

पालेभाज्या, सॅलेड, फळभाज्या आणि सर्व प्रकारची फळे आहारात असायलाच हवीत. उत्तम आरोग्याच्यादृष्टीने प्रत्येक भाजी आणि फळाचे वेगळे महत्त्व आहे. त्यामुळे तुमच्या स्वयंपाकघरात असायलाच हवीत. म्हणजे या पदार्थांचा आहारात समावेश नकळत वाढेल. अनेक भाज्या आणि फळे शरीरावरील वाढलेली चरबी कमी करण्यासाठीही उपयुक्त असतात.

सॅलेड महत्त्वाचे

सॅलेड आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. वजन कमी करण्यासाठी डॉक्टर आणि आहारतज्ज्ञ कायमच सॅलेड खाण्याचा सल्ला देतात. याचे कारण म्हणजे सॅलेडमधील पोषक तत्त्वे वजनावर नियंत्रण आणण्यासाठी अतिशय उपयुक्त असतात. मेटाबॉलिक रेट हाय ठेवण्याचे काम सॅलेड करते ज्यामुळे वजनावर नियंत्रण येण्यास मदत होते.

फळांमध्ये बदल करत राहा

वेगवेगळ्या फळांचे आरोग्यासाठी अतिशय चांगले उपयोग असतात. वेगवेगळी फळे आहारात खाल्ल्याने शरीराला पुरेशी पोषक तत्त्वे मिळतात. वेगवेगळ्या फळांचा समावेश केल्याने कंटाळा न येता व्यक्ती मनापासून ते खाऊ शकतो.

जंक फूड नको

अनेकांच्या स्वयंपाकघरात डब्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची बिस्कीटे, चिप्स यांसारखा खाऊ भरुन ठेवलेला असतो. घरातील लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच तो खाऊ येताजाता आनंदाने खातात. मात्र अशाप्रकारे जंकफूड आणि बेकरी प्रॉडक्टस खाणे आरोग्यासाठी हानिकारक असते. त्यामुळे हे पदार्थ शक्यतो स्वयंपाकघरात टाळावेत.