मोबाईल कंपन्यांमध्ये सुरु असलेले वॉर दिवसेंदिवस अधिकाधिक वाढत असताना दिसत आहे. मागच्या काही महिन्यात अनेक कंपन्या आपली नवनवीन मॉडेल्स बाजारात दाखल करत आहेत. चीनची कंपनी असलेल्या OnePlus कंपनीचा OnePlus 6 हा फोन अखेर भारतात दाखल झाला आहे. कालच हा फोन लंडनमध्ये लाँच करण्यात आला आणि त्यानंतर तो भारत आणि चीनमध्ये लाँच करण्यात आला. या बहुप्रतिक्षीत फोनच्या किंमतीबाबत मोठ्या प्रमाणात चर्चा सुरु होती. मात्र अखेर कंपनीने या फोनची किंमत जाहीर करत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. कंपनीने आपल्या या नव्या मॉडेलची भारतातील किंमत जाहीर केली असून येत्या काही दिवसांतच हा फोन ऑनलाइन खरेदी करता येईल असेही जाहीर केले आहे.

6 जीबी रॅम आणि 64 जीबी इंटरनल मेमरी असणाऱ्या या फोनची किंमत ३४,९९९ रुपये आहे. तर ८ जीबी रॅम 256 जीबी मेमरी असणाऱ्या फोनची किंमत ३९,९९९ आहे असे लाँचिंग सोहळ्यात जाहीर करण्यात आले. प्रसिद्ध स्टार अमिताभ बच्चन हे कंपनीचे ब्रँड अँबेसिडर असून त्यांनी भारतातील फोनच्या किंमती जाहीर केल्या. या फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८४५ प्रोसेसर देण्यात आला आहे. वॉटर रेजिस्ट्ंट असल्याने त्याचा पाण्याशी संपर्क आला तरीही तो खराब होणार नाही. या शिवायही इतर अनेक आकर्षक फिचर्स देण्यात आले आहेत.

६.२८ इंचाचा डिस्प्ले असलेल्या या फोनला २.८ गिगाहार्डजचा ऑक्टाकोअर प्रोसेसर देण्यात आला आहे. ३३०० मिलिअॅम्पियर्सची बॅटरी देण्यात आली आहे. फोनचा लूक अतिशय आकर्षक असून त्याची पाठीमागची बाजू सिरॅमिकची असेल असे सांगण्यात आले आहे. iPhone X प्रमाणे विशेष नॉच देण्यात आलेला आहे. मात्र ज्यांना हा नॉच नको असेल त्यांना तो लपविता येईल अशी सुविधाही करण्यात आली आहे. या फोनला OnePlus 5T प्रमाणे ३ कॅमेरे देण्यात आले आहेत. एकूण तीन कॅमेरे देण्यात आले असून २० आणि १६ मेगापिक्सलचे रिअर कॅमेरे असतील, तर फ्रंट कॅमेरा २० मेगापिक्सलचा असेल.