OnePlus ही मोबाइल कंपनी मागच्या काही दिवसांत बरीच चर्चेत आली आहे. आकर्षक फिचर्स असलेले स्मार्टफोन बाजारात दाखल केल्याने कंपनीचे नाव घेतले जात आहे. विशेष म्हणजे कंपनीच्या OnePlus 6 या फोनची तर मागील काही दिवसांपासून जोरदार चर्चा आहे. हा फोन नेमका कधी लाँच होणार, त्याची फिचर्स आणि किंमत याबाबत ग्राहकांमध्ये मोठ्या प्रमाणात उत्सुकता होती. या महिन्यात लाँच होणारा या फोनची किंमत अखेर लीक झाली आहे. १६ मे रोजी हा फोन लंडनमध्ये लाँच होणार असून १७ मे रोजी तो भारत आणि चीनमध्ये लाँच होईल. अॅमेझॉन इंडियावर या फोनच्या खरेदीसाठीचे रजिस्ट्रेशन पेज सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे तुम्ही हा फोन खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ऑनलाइन रजिस्ट्रेशन करु शकता. नुकत्याच आलेल्या वृत्तानुसार, OnePlus 6 च्या ६४ जीबी आणि १२८ जीबीच्या फोनची किंमत लीक झाली आहे. याशिवाय कंपनी २५६ जीबीचा फोनही लाँच करणार असल्याचे बोलले जात होते मात्र त्याच्या किंमतीबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही.
OnePlus 6 च्या ६४ जीबीच्या फोनची किंमत ३६,९९९ रुपये तर १२८ जीबी च्या फोनची किंमत ३९,९९९ रुपये असेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. ६४ जीबीच्या स्टोरेजमध्ये ६ जीबी की ८ जीबीची रॅम देण्यात येणार याबाबत स्पष्टता नाही. काही दिवसांपूर्वी OnePlus ने आपण येत्या काळात इयरबडसचा जॅक असलेले मोबाइल तयार करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नव्याने येणाऱ्या OnePlus 6 या फोनला अशी सुविधा असेल का याबाबतही उत्सुकता आहे. या फोनमध्ये iPhone X प्रमाणे विशेष नॉच देण्यात आलेला आहे. मात्र ज्यांना हा नॉच नको असेल त्यांना तो लपविता येईल अशी सुविधाही करण्यात आली आहे. या फोनच्या फिचर्सबाबतही मोठ्या प्रमाणात उत्सुकता असून लवकरच हे फिचर्स आपल्यासमोर येतील. OnePlus 6 हा कंपनीचा फ्लॅगशीप फोन असेल. सध्या बाजारात उपलब्ध असणाऱ्या OnePlus 5T हा कंपनीचा फ्लॅगशीप फोन आहे. ढोबळपणे सांगायचे झाले तर कंपनीचा सर्वोत्तम फोन किंवा जो फोन कंपनी आपली ओळख म्हणून बाजारात उतरवते त्याला फ्लॅगशीप फोन म्हणतात.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on May 1, 2018 12:54 pm