भारत-चीन दरम्यान सीमेवर सुरू असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार घालण्याची मागणी विविध स्तरावर होत आहे. सोशल मीडियावर अशा आशयाचं आवाहन केलं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र उलट चित्र दिसून येतंय. चिनी कंपनी वन प्लसच्या लेटेस्ट ‘वन प्लस 8 प्रो’ या स्मार्टफोनसाठी काल (दि.18) भारतात सेल आयोजित करण्यात आला होता. अ‍ॅपल आयफोनच्या तोडीची किंमत असलेल्या या फोनला भारतीय ग्राहकांचा मात्र शानदार प्रतिसाद मिळाला आणि हा सेल सुरू झाल्यानंतर हा फोन काही मिनिटांमध्येच ‘सोल्ड आउट’ झाल्याचं समोर आलं आहे.

Bloomberg च्या वृत्तानुसार, काल (दि.18) वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी अ‍ॅमझॉन आणि वन प्लसच्या अधिकृत संकेतस्थळावर खास सेल आयोजित करण्यात आला होता. दुपारी 12 वाजता सेलला सुरूवात झाली, पण अ‍ॅमझॉनच्या वेबसाइटवर काही मिनिटांमध्येच हा फोन सोल्ड आउट झाला. सेलमध्ये OnePlus 8 Pro 5G खरेदी करणाऱ्यांसाठी काही ऑफरही होत्या. एसबीआयच्या कार्डद्वारे हा फोन खरेदी केल्यास 3,000 रुपये इंस्टंट डिस्काउंट मिळत होते. याशिवाय जिओच्या ग्राहकांना 6,000 रुपयांपर्यंतच्या जिओ बेनिफिट्सची ऑफर होती. तसेच ग्राहकांना हा फोन खरेदी करण्यासाठी नो-कॉस्ट ईएमआयचा पर्यायही देण्यात आला होता. एकीकडे चिनी सैनिकांसोबत झालेल्या संघर्षात २० भारतीय जवान शहीद झाल्याच्या पार्श्वभूमीवर चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची मागणी होत असताना हा चिनी फोन सेलमध्ये काही मिनिटांतच विकला गेल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

यापूर्वी वन प्लस 8 प्रो 5G या फोनसाठी 29 मे रोजी सेलचं आयोजन करण्यात आलं होतं. पण, करोना व्हायरसमुळे मॅन्युफॅक्चरिंग प्लांट बंद झाल्यानंतर तो सेल पुढे ढकलण्यात आला होता. त्यानंतर हा 15 जून रोजी पहिल्यांदा सेलमध्ये उपलब्ध झाला. त्यावेळीही फोन काही मिनिटांतच सोल्ड आउट झाला होता.

OnePlus 8 Pro स्पेसिफिकेशन्स आणि किंमत :-
OnePlus 8 Pro स्मार्टफोनमध्ये HDR10+ सपोर्ट आणि गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनसह 6.78 इंचाचा QHD+ Fluid AMOLED डिस्प्ले आहे. लेटेस्ट क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसह या फोनमध्ये 12 जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत स्टोरेज मिळेल. फोनच्या मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा क्वॉड रिअर कॅमेरा सेटअप आहे. यात एक कॅमेरा 48 मेगापिक्सलचा प्रायमरी सेंसर, दुसरा 48 मेगापिक्सलचा वाइड अँगल कॅमेरा आहे. याशिवाय, 8 मेगापिक्सलचा टेलिफोटो लेंस आणि 5 मेगापिक्सलचा कलर फिल्टर लेंसही आहे. तर, सेल्फीसाठी फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळेल. अँड्रॉइड 10 आधारित OxygenOS वर कार्यरत असणाऱ्या या फोनमध्ये 4510mAh ची बॅटरी आहे. हा स्मार्टफोन अल्ट्रामरीन ब्लू, ऑनिक्स ब्लॅक आणि ग्लेशियल ग्रीन अशा तीन रंगांमध्ये उपलब्ध आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये लाँच करण्यात आला आहे. याच्या 8 GB रॅम आणि 128 GB स्टोरेज मॉडेलची किंमत 54,999 रुपये आहे. तर, 12 GB रॅम आणि 256 GB स्टोरेज असलेल्या मॉडेलची किंमत 59,999 रुपये आहे.