OnePlus ही मोबाइल कंपनी मागच्या काही दिवसांत बरीच चर्चेत आली आहे. आकर्षक फिचर्स असलेले स्मार्टफोन बाजारात दाखल केल्याने कंपनीचे नाव घेतले जात आहे. त्यानंतर आता कंपनी मोबाइल अॅक्सेसरी असलेल्या इयरबडसची निर्मिती करणार आहे. विशेष म्हणजे हे इयरबडस सामान्य नसून वायरलेस असतील असेही कंपनीने सांगितले आहे. या इयरबडसचे नाव ‘बुलेटस’ असे ठेवण्यात आले असल्याचे कंपनीने सांगितले आहे. बऱ्याच दिवसांपासून प्रतिक्षेत असलेला कंपनीचा OnePlus 6 हा फोन काही दिवसांत लाँच होणार आहे. त्याबरोबरच हे वायरलेस इयरबडसही लाँच करण्यात येतील असे कंपनीने सांगितले आहे.

OnePlus ने आपण येत्या काळात इयरबडसचा जॅक असलेले मोबाइल तयार करणार असल्याचे सांगितले होते. त्यामुळे नव्याने येणाऱ्या OnePlus 6 या फोनला अशी सुविधा असेल अशी आशा होती. मात्र त्याबाबत अद्याप काही सांगण्यात आलेले नाही. आता बाजारात अॅपलच्या फोनला २०१६ पासून ही सुविधा उपलब्ध असून OnePlus अॅपलला वायरलेस इयरबडसच्या बाबतीत चांगली टक्कर देईल असा अंदाज आहे. मात्र यावर्षीच्या दुसऱ्या टप्प्यात आयपॉडचे व्हर्जन सुधारण्यात येईल असा अंदाज आहे. याबरोबरच बाजारातील आणखी काही कंपन्याही येत्या काळात वायरलेस इयरबडस दाखल करण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे OnePlus आपल्या चाहत्यांसाठी खास पर्वणी घेऊन येत आहे असे म्हणायला हरकत नाही.