प्रीमियम स्मार्टफोन निर्माती कंपनी OnePlus आता टीव्ही क्षेत्रात पदार्पण करण्याच्या तयारीत असून लवकरच एक नवीन टीव्ही लॉंच करणार आहे. स्मार्टफोन क्षेत्रामध्ये दर्जेदार स्मार्टफोनमुळे स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणारी वन प्लस टीव्ही क्षेत्रात देखील स्टँडर्ड सेट करेल अशी अपेक्षा वर्तवली जात आहे. गेल्या काही महिन्यांपासून या टीव्हीबाबत बरीच चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यात कंपनीने या टीव्हीच्या नावाचा खुलासा केला.

कंपनीकडून या टीव्हीचं नाव ठेवण्याबाबत बरंच विचारमंथन करण्यात आलं होतं. चांगल्या नावासाठी स्पर्धाही घेण्यात आली होती. मात्र, अखेर OnePlus TV हेच नाव निश्चित करण्यात आलं आहे. OnePlus TV या नावाने हा स्मार्ट टीव्ही लाँच केला जाणार आहे. दुसऱ्या कोणत्याही नावापेक्षा आमच्या कंपनीचं नाव जास्त चांगल्याप्रकारे आमच्या ब्रॅण्डचं आणि दर्जाचं प्रतिनिधित्व करेल’ असं कंपनीकडून सांगण्यात आलंय. वन प्लसने अधिकृत फोरमवर याबाबत पोस्टद्वारे माहिती दिली आहे. तसंच या टीव्हीच्या ऑफिशियल लोगोचाही कंपनीने खुलासा केला आहे. या लोगोमध्ये वन प्लस (1+) समोर टीव्ही लिहिलं असणार आहे. हा टीव्ही पुढील महिन्यात २६ सप्टेंबर रोजी लॉंच होण्याची शक्यता आहे.

टीव्हीमध्ये कोणते फीचर्स असतील याबाबत कंपनीकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. पण इंटरनेटवर लीक झालेल्या काही फीचर्सनुसार या टीव्हीत स्क्रीन साइजचे चार पर्याय असतील. हा टीव्ही 43 इंच, 55 इंच, 65 इंच आणि 75 इंच प्रकारात लाँच होऊ शकतो. भारतासोबत हा टीव्ही चीन, अमेरिका आणि कॅनडात लाँच केला जाईल. 75 इंचाचं मॉडल केवळ चीन आणि अमेरिकेतच लाँच केलं जाईल अशीही चर्चा आहे. याची किंमत किती असेल याबाबत अद्याप काहीही माहिती नाही, पण प्रीमियम श्रेणीतील असल्याने या टीव्हीची किंमत 50 हजारांच्या जवळपास असू शकते. शाओमीने भारतात काही दिवसांपूर्वीच 45,000 ते 50,000 रुपयांदर्मयान आपले टीव्ही सादर केलेत, त्यामुळे याच श्रेणीत टीव्ही लाँच करुन शाओमीला टक्कर देण्याचाही कंपनीचा विचार असू शकतो. या टीव्हीत ब्ल्यू टुथ 5.0 व्हर्जनचा सपोर्ट, गुगल असिस्टंट व्हॉइस कंट्रोल, इंटिग्रेटेड कॅमेरा यांसारखे अनेक दर्जेदार फीचर्स असू शकतात.