देशाची अर्थव्यवस्था हे त्या देशाचे गणित समजण्याचा एक महत्त्वाचा मापदंड ठरु शकतो. भारतातील संपत्तीबाबतचा एक अहवाल नुकताच समोर आला असून त्याव्दारे अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. देशातील जवळपास तीन चतुर्थांश म्हणजेच ७३ टक्के संपत्ती ही ज्या श्रीमंत वर्गाकडे आहे त्या वर्गाचे प्रमाण आहे १ टक्के. म्हणजे एकूणच देशातील आर्थिक दरी किती मोठी असेल हे आपल्याला या गोष्टीवरुन अगदी सहज लक्षात येऊ शकते.

‘ऑक्सफेम’च्या ‘रिवॉर्ड वर्क, नॉट वेल्थ’ या अहवालात नुकतीच काही निरीक्षणे नोंदविण्यात आली त्यातून ही आकडेवारी समोर आली आहे. स्वित्झर्लंडमधील दावोसमध्ये होणाऱ्या विश्व आर्थिक मंचाच्या वार्षिक बैठकीच्या निमित्ताने ही आकडेवारी जाहीर करण्यात आली आहे. भारतातील अब्जाधीशांची संख्या आता १०१ वर गेली आहे. मागील १८ वर्षांपूर्वी म्हणजेच २०१८ मध्ये ही संख्या केवळ ९ होती. मागील वर्षी २०१७ मध्ये एका वर्षात भारतात १७ अब्जाधीशांची नोंद झाली.

आर्थिक दरी मोठी एसून एकीकडे ७३ टक्के संपत्ती १ टक्के लोकांकडे असताना दुसरीकडे, ६७ कोटी गरीब जनतेच्या एकूण संपत्तीत केवळ १ टक्क्याने वाढ झाली आहे. वारसाहक्काने संपत्ती मिळालेल्या अब्जाधीशांची टक्केवारी ३७ इतकी आहे. यातील महिला अब्जाधीश ४ आहेत. २०१८ ते २०२२ या ४ वर्षांच्या कालावधीत देशात नवीन ७० लक्षाधीशांची भर पडेल अशी शक्यताही सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने व्यक्त केली आहे.