भारतातील इंटरनेट स्पीड सरासरीपेक्षाही कमी असल्याची आकडेवारी समोर आली आहे. Ookla या कंपनीने स्पीडटेस्ट ग्लोबल निर्देशांक अहवालाच्या आधारे ही माहिती समोर आली आहे. तसंच, जगभरात मोबाइल इंटरनेट स्पीडमध्ये 21.4 टक्क्यांची वाढ झाल्याचंही या अहवालात नमूद करण्यात आलं आहे. याशिवाय ब्रॉडबँडच्या स्पीडमध्येही 37.4 टक्क्यांची वाढ झाली आहे. तरीही भारतातील इंटरनेट स्पीड जगभरातील सरासरी इंटरनेट स्पीडपेक्षाही कमी असल्याचं समोर आलं आहे. भारताशिवाय रशियातही इंटरनेट स्पीड सरासरीपेक्षाही कमी असल्याचं या अहवालात म्हटलंय.

भारतात मोबाईलच्या वापरामध्ये 16.3 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे, तर फिक्स्ड ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये 28.5 टक्क्यांची वाढ झाली आहे. पण, इंटरनेट स्पीडच्या बाबतीत सिंगापूरने अव्वल स्थान गाठलं आहे. सिंगापूरमध्ये फिक्स्ड ब्रॉडबँडच्या स्पीडमध्ये 5.6 टक्क्यांची वाढ नोंदवण्यात आली आहे. तर, 5G नेटवर्कची सेवा असलेल्या दक्षिण कोरियामध्ये मोबाईल इंटरनेट डाउनलोड स्पीडमध्ये 165.9 टक्क्यांची वाढ झाली आहे.

दक्षिण आशियाई देशांमध्ये भारताशिवाय पाकिस्तान आणि अफगाणिस्तानातही इंटरनेट स्पीड सरासरीपेक्षा कमी नोंदवण्यात आला आहे. इतर देशांच्या बाबतीत विचार केल्यास फिलिपाइन्स, व्हिएतनाम, कंबोडिया आणि जॉर्डनसारख्या देशांतही इंटरनेट स्पीड कमी आहे.