गेल्या आठवड्यात Oppo कंपनीने भारतीय बाजारात आपली सब-ब्रँड कंपनी Realme चा नवा फोन Realme 2 लॉन्च केला होता. आज पहिल्यांदाच या फोनचा सेल आयोजीत करण्यात आला आहे. दुपारी 12 वाजल्यापासून फ्लिपकार्टवर या स्मार्टफोनचा सेल सुरू होत आहे. पहिलाच सेल असल्याने कंपनीने या फोनवर अनेक आकर्षक ऑफरही देऊ केल्या आहेत.

हा फोन एचडीएफसी बँक डेबिट/क्रेडिट कार्ड यूजर्सना ७५० रुपयांच्या डिस्काऊंटसह मिळणार आहे. याशिवाय एक्स्चेंज ऑफरनुसार फोन खरेदी करणाऱ्या ग्राहकाला पाचशे रुपयांचा अतिरिक्त लाभ मिळेल. तर, रिलायन्स जिओकडून या फोनसाठी 2200 रुपयांची कॅशबॅक ऑफऱ आहे. तसंच पेटीएमकडूनही 2200 रुपयांचे व्हाउचर दिले जात आहेत. नो-कॉस्ट इएमआयचा पर्याय देखील ग्राहकांना देण्यात आला आहे.
फुल एचडी नॉच डिस्प्ले असलेल्या या फोनमध्ये 6.2 इंचाची स्क्रिन देण्यात आली आहे. आयफोन X प्रमाणे हा डिस्प्ले देण्याचा प्रयत्न कंपनीने केला आहे. या फोनमध्ये ड्युअल कॅमेरा, स्लिम डिझाईन, गोरिल्ला ग्लास, तगडी बॅटरी, पोर्ट्रेट मोड, यांसारखे अनेक फिचर्स देण्यात आले आहेत.

Realme 1 हा फोन आधीपासूनच भारतीय बाजारात उपलब्ध असून या फोनला ग्राहकांचा चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर कंपनीने Realme 2 लॉन्च करण्याचा निर्णय घेतला होता. Realme 2 हा फोन 3 जीबी रॅम आणि 32 जीबी स्टोरेज व 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज या दोन व्हेरिअंटमध्ये उपलब्ध करुन देण्यात आला आहे. 4 सप्टेंबरपासून या फोनच्या विक्रीला सुरूवात होईल. केवळ फ्लिपकार्टवरुनच ग्राहकांना हा फोन खरेदी करता येईल. या फोनच्या 3 जीबी रॅमच्या व्हेरिअंटची किंमत 8 हजार 990 रुपये तर 4 जीबी रॅम असलेल्या फोनची किंमत 10 हजार 990 रुपये आहे.

या फोनमध्ये क्वॉलकॉम ऑक्टाकोर 450 प्रोसेसर असून याच्या मागील बाजूला 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचे दोन कॅमेरे आणि पुढील बाजूला 8 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे, याशिवाय 4230mAh ची तगडी बॅटरी फोनमध्ये आहे.