वायुप्रदूषणाच्या सूक्ष्म प्रदूषकांमुळे तोंडाचा कर्करोग होण्याचा धोका बळावत असल्याचा दावा एका अभ्यासात करण्यात आला आहे.

जगभरातील विविध भागांमधून तोंडाच्या कर्करोगाची नवी प्रकरणे आणि त्यामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे, असे तैवानमधील आशिया विद्यापीठ आणि चुंग शान वैद्यकीय विद्यापीठ येथील संशोधकांनी म्हटले. धूम्रपान, मद्यपान, मानवी पॅपिलोन रोगजंतू आणि दक्षिण आशियातील काही भागांत पान खाणे आदी तोडांच्या कर्करोगाची मुख्य कारणे आहेत.

पेट्राकेमिकल कंपन्यांमधून उत्सर्जन होणाऱ्या धुराच्या संपर्कात आल्यामुळे देखील तोंडाच्या कर्करोगाचा धोका बळावत असल्याचे संशोधकांनी म्हटले. वायुप्रदूषणातील अतिसूक्ष्म कण (पीएम२.५) हे श्वसन आणि हृदयाच्या आरोग्यासाठी हानीकारक असल्याचे संशोधकांनी म्हटले. हा अभ्यास ‘जर्नल ऑफ इन्व्हेस्टिगेटिव्ह मेडिसिन’ या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आला आहे. २००९मधील ६६ ही वायू गुणवत्ता असताना हवेतील प्रदूषकांच्या (सल्फर डायऑक्साइड, कार्बन मोनॉक्साइड, ओझोन, नायट्रोजन मोनॉक्साइड, नायट्रोजन डायऑक्साइड) सरासरी पातळीचा त्यांनी अभ्यास केला. २०१२-१३ मध्ये त्यांनी ४० किंवा त्यापेक्षा जास्त वय असणाऱ्या ४,८२,६५९ लोकांच्या आरोग्यविषयक माहितीचा अभ्यास केला. त्यानंतर वायु प्रदूषकांचा आधार घेत तोंडाच्या कर्करोगाच्या प्रकरणांना स्थानिक भागाशी जोडण्यात आले. २०१२-१३ मध्ये पुरुषांमध्ये कर्करोगाची १६१७ प्रकरणे आढळून आली. तोंडाच्या कर्करोगाच्या निदानामध्ये धुम्रपान करणे आणि पान खाणे हे सर्वाधिक धोक्याचे आढळून आले. त्याचप्रमाणे पीएम२.५ च्या वाढत्या पातळीमुळे देखील कर्करोगाचा धोका बळावत असल्याचे संशोधकांना आढळून आले.