ज्या व्यक्ती नियमितपणे संत्री खातात त्यांना डोळ्यांचे विकार होण्याचे प्रमाण कमी असते असे एका भारतीय वंशाच्या संशोधकाने स्पष्ट केले आहे. तसेच स्नायू कमकुवत होणे हे दृष्टी कमी होण्याचे प्रमुख कारण आहे. त्यामुळे संत्री त्यावर परिणामकारक ठरतात.

ऑस्ट्रेलियातील वेस्टमेड इन्टिटय़ूट फॉर मेडिकल रिसर्चमध्ये सुमारे २००० ज्येष्ठ नागरिकांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या व सतत १५ वर्षे त्यांच्याशी संपर्क ठेवला. त्यात जी व्यक्ती रोज किमान एक संत्रे खाते तिला डोळ्याची व्याधी होण्याची शक्यता ६० टक्के कमी असल्याचे निष्पन्न झाले. ज्या व्यक्ती संत्रेच खात नाहीत, त्यांच्यात डोळ्याच्या व्याधीचे प्रमाण अधिक असते असे प्रमुख संशोधक बेमिनी गोपीनाथ यांनी सांगितले. आठवडय़ातून एकदा जरी संत्रे खाल्ले तरी त्याचा लाभ होतो असे संशोधकांनी स्पष्ट केले आहे. आतापर्यंत संशोधकांनी डोळ्यावर फायद्याच्या दृष्टीने सी, ई किंवा ए जीवनसत्त्वांच्या (व्हिटॅमिन) फायद्याचा विचार केला. मात्र आम्ही फळांपासून होणार लाभ व डोळ्याचा विकार यांच्या संबंधावर लक्ष केंद्रित केल्याचे त्यांनी सांगितले.

केवळ संत्रेच नव्हे तर सर्वच फळांचा लाभ काहीना काही प्रकारे होतो असे त्या म्हणाल्या. चहा, सफरचंद, रेड वाइन तसेच संत्रे यांचा संशोधकांनी अभ्यास केला. यात इतर प्रदार्थ हे डोळ्यांच्या व्याधीवर फारसे परिणामकारक नसल्याचे आम्ही अभ्यासले. डोळ्यांचे विकार पन्नाशीनंतर बळावतात. कारण वयाबरोबर स्नायू क्षीण होतात. त्यामुळे आजार पूर्ण बरा होणे कठीण असते. त्यामुळे संत्री खाल्ल्यास याला आळा घालता येईल असा सल्ला संशोधकांनी दिला आहे.