प्रतिकूल हवामानामुळे ऐन मार्गशीर्षांच्या हंगामात यंदा फळांची आवक कमालीची घटली असून केळी, सफरचंद, मोसंबी, द्राक्ष यांसारख्या फळांचे दर एकीकडे गगनाला भिडले असताना ठाणे, कल्याण, डोंबिवली यांसारख्या बाजारपेठांमध्ये गेल्या काही दिवसांपासून संत्र्याची केशराई पसरली आहे. कल्याण बाजार समितीअंतर्गत येणाऱ्या फळबाजारात बुधवारी दिवसभरात सुमारे पाच लाख संत्र्यांची आवक झाल्याने संत्र्याचे घाऊक बाजारातील दर २२ रुपयांपर्यंत खाली उतरले आहेत. किरकोळ बाजारात मात्र हीच संत्री ६० रुपयांनी विकली जात असून सफरचंद, डाळिंब, सीताफळाच्या किमतीने कधीच शंभरी ओलांडल्याने मार्गशीर्षांच्या उपवासाला फळे वज्र्य करण्याची वेळ गृहिणींवर आली आहे.
मार्गशीर्षांचा महिना महिलांसाठी व्रतवैकल्याचा मानला जातो. यानिमित्ताने मांडल्या जाणाऱ्या पूजेसाठी मोठय़ा प्रमाणात फळांची खरेदी केली जाते. त्यासाठी पाच प्रकारच्या वेगवेगळ्या प्रकारच्या फळांची मागणी असते. प्रतिकूल हवामानामुळे यंदा मात्र फळांची आवक कमी झाल्याने बाजारात तेजीचा माहोल असून उठाव मात्र कमी झाला आहे. इतर फळांची आवक कमी असली तरी कल्याण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या फळबाजारात नागपूर आणि अमरावतीमधून मोठय़ा प्रमाणावर संत्र्यांची आवक झाली असून ही दररोज सुमारे साडेपाच हजार क्विंटल संत्री ठाणे, कल्याण, डोंबिवलीच्या बाजारात येऊ लागली आहेत. आवक वाढल्याने संत्र्याचे दर किलोमागे २२ रुपये असे कोसळले असून दररोज सुमारे एक कोटी २१ लाखांहून अधिक किमतीची संत्री या बाजारात येत आहेत, अशी माहिती कल्याण कृषी उत्पन्न बाजार समिती सचिव शामकांत चौधरी यांनी दिली. घाऊक बाजाराप्रमाणेच किरकोळ बाजारामध्येही संत्र्याची विक्री मोठय़ा प्रमाणात होत आहे. किरकोळ बाजारात वेगवेगळ्या आकाराची संत्री उपलब्ध होत असून ५० ते १०० रुपये डझन याप्रमाणे किरकोळ बाजारात विक्री होत आहे.

बुधवारी ६० लाखांची उलाढाल
मार्गशीर्ष महिन्याचा अखेरचा गुरुवार असल्याने बुधवारी बाजार समितीच्या आवारात संत्र्याला मोठी मागणी होती. सफरचंद, द्राक्ष, केळी, सीताफळे यांसारख्या फळांची आवक कमालीची घटली आहे. द्राक्षांचा हंगाम अजून सुरूही झालेला नाही. सफरचंद, डाळिंबाची आवक घटल्याने बाजारात सगळीकडे संत्र्याची केशराई पसरल्यासारखे चित्र आहे. आवक घटल्याने किरकोळ बाजारात केळी (४० रुपये डझन), सफरचंद (१४० ते ३५० रुपये), डाळिंब (२०० रुपये), कलिंगड (३० रुपये किलो), पपई (४० रुपये किलो), स्ट्रॉबेरी (१०० रुपये), पेरू (६० रुपये) अशा फळांच्या किमती कमालीच्या वाढल्याचे चित्र आहे. मार्गशीर्ष महिन्यातील उपवासाचा शेवटचा गुरुवार असल्याने या दरात मोठी वाढ झाल्याचे किरकोळ विक्रेत्यांनी सांगितले. त्यामुळे भरपूर आवक असलेल्या संत्र्यावर ग्राहकांच्या उडय़ा पडत होत्या.