फेसबुक, व्हॉट्स अॅप, इन्स्टाग्राम ज्यावेळी नव्हतं तेव्हा ऑर्कुटनं सगळ्यांनाच अक्षरश: वेड लावलं होतं. इंटरनेटवरील मैत्रीच्या व्हर्च्युअल कट्ट्याची ओळख आपल्याला सर्वप्रथम ऑर्कुटनं करुन दिली असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही. पण नंतर फेसबुक आलं आणि ऑर्कुट कुठच्या कुठे गायब झालं. ऑर्कुटकडे सगळ्यांनीच पाठ फिरवली. अखेर ऑर्कुटची घटत चाललेली प्रसिद्धी पाहता सप्टेंबर २०१४ मध्ये ऑर्कुट बंद झालं. आता हेच ऑर्कुट नव्या ढंगात परत आलंय. ऑर्कुटचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘हॅलो’ आता भारतातही सुरू झालं आहे.

सोशल मीडियामुळे लोक जवळ येण्याऐवजी एकमेकांपासून दूर जात आहेत पण ‘हॅलो’मुळे लोक एकमेकांशी जोडले जातील. त्यांना एकमेकांशी संपर्क साधणं सोपं होईल. प्रत्येक युजर्सला त्यांच्या आवडीप्रमाणे इथे लोक भेटतील, त्यांच्यासाठी हे नवीन व्यासपीठ नक्कीच फायद्याचं ठरेल असा विश्वास ‘हॅलो’नं व्यक्त केला आहे. येथे युजर्सला बरंच काही नवीन अनुभवता येणार आहे. तुमच्या कल्पना तुमचं सर्जनशील काम तुम्हाला या व्यासपीठाद्वारे इतरांसमोर मांडता येणार आहे, असं हॅलोनं म्हटलं आहे.

केंब्रिज अॅनालिटीका प्रकरणामुळे सध्या फेसबुकविरोधात जगभरातून नाराजीचे वारे वाहत आहेत. साडेआठ कोटी युजर्सची वैयक्तीक माहिती लीक झाल्यानं जगभरात खळबळ उडाली आहे. त्यामुळे अनेकांनी फेसबुक डिलीट करणं पसंत केलं आहे. अशावेळी अत्यंत योग्य वेळेत ‘हॅलो’ लाँच केल्यानं भारतीय ग्राहकांकडूनही याला चांगला प्रतिसाद लाभेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.