कावासाकी इंडियाची भारतात असेंबल होणारी निंजा ZX-10R ही बाइक लॉंचिंगच्या केवळ १५ दिवसांमध्येच आउट ऑफ स्टॉक झाली आहे.  कावासाकीने भारतीय बाजारात ZX-10R चे दोन व्हेरियंट्स, निंजा ZX10R आणि ZX10RR सादर केले होते. भारतात असेंबल झाल्याने ZX-10R बाइकच्या किंमती ५ ते ६ लाखांनी कमी झाल्या, त्यामुळे लॉंचिंगच्या १५ दिवसांमध्येच या गाडीच्या जवळपास १०० युनिट्सची बुकिंग झाली आहे. पुढील काही महिन्यांमध्ये गाडीची डिलिव्हरी सुरू होईल.

यापूर्वी Kawasaki ZX10R ला पूर्णतः इंपोर्ट केलं जात होतं, त्यावेळी या बाइकची एक्स-शोरूम किंमत १८.८ लाख रुपये होती आणि ऑन रोड किंमत २२ ते २३ लाख रुपयांपर्यंत असायची. मात्र, आता भारतात असेंबल होत असल्यामुळे कावासाकी निंजा ZX10R ची किंमत १२.८ लाख रुपये झाली आहे. तर कावासाकी निंजा ZX10RR साठी १६.१० लाख रुपये द्यावे लागतील.

भरमसाठ सूट मिळाल्याने या बाइकची झटपट बुकिंग झाली. भारतात असेंबल झाल्याने बाइकवर लागणारी इंपोर्ट ड्युटीची बचत होते आणि त्याचा थेट फायदा हा ग्राहकाला भेटतोय. जगभरात Kawasaki ZX10R बाइकचे तीन व्हेरियंट्सची विक्री होते. Kawasaki ZX10R आणि ZX10RR बाइक्समध्ये ट्रॅक्शन कंट्रोल, क्विक शिफ्टर, कॉर्नर मॅनेजमेंट फंक्शन, इत्यादी देण्यात आले आहेत. यामध्ये 998 सीसी, लिक्विड कूल्ड, इन-लाइन, 4 सिलिंडर इंजिन आहे, हे इंजिन 197 बीएचपी पावर आणि 113.5 न्यूटन मीटर पीक टॉर्क जनरेट करतं. या बाइक्सची होंडा CBR1000RR Fireblade, यामाहा R1, सुजुकी GSX1000R आणि BMW S1000RR यांच्यासोबत टक्कर पाहायला मिळेल.