पॅनाशिया बायोटेक या लस निर्मात्या कंपनीने ‘इझी फोर टीटी’ ही पंचगुणी लस तयार केली असून ती विक्रीस उपलब्ध करण्यात आली आहे. प्राथमिक प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून या लसीचा उपयोग डिफ्थेरिया, टिटॅनसस पेरटसिस व हिब मेंदुज्वरावर होणार आहे. द्रव स्वरूपातील ही लस असून त्यात वेळ वाचणार आहे, तसेच लस देताना चुका होण्याची शक्यता कमी होणार आहे. पॅनाशिया बायोटेकचे व्यवस्थापकीय संचालक राजेश जैन यांनी सांगितले की, लोकांना आरोग्य सुविधा देताना अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर आम्ही करीत आहोत. परवडणाऱ्या दरात लसी उपलब्ध करून देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे. कंपनीने जागतिक आरोग्य संघटनेला १० अब्ज लसींचा पुरवठा केला आहे. त्या लसी पोलिओशी संबंधित असून विकसनशील देशांत मुलांना या लसी दिल्या जात आहेत. आताची पंचगुणी लस ही डांग्या खोकला, धनुर्वात, मेंदुज्वर यावरही गुणकारी आहे. त्यामुळे लहान बाळांचे या रोगांपासून संरक्षण होणार आहे. या लसीमुळे बराच काळ मुलांना या रोगांची लागण होणार नाही.

(टीप : आरोग्यवार्तामधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी लोकसत्ताचा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)