News Flash

मधुमेद – एक नाकचूक

मधुमेह हा मधुमेद या रोगाचा उपप्रकार आहे.

मेद पूर्ण न जळल्यामुळे कीटोन्स नावाचा पदार्थ तयार होतो. मधुमेहाच्या घातक परिणामांना हे कीटोन्स जबाबदार असतात.

शर्करायोग
मधुमेह म्हणजे पॅनक्रिअ‍ॅसमधील पदार्थ आणि नियंत्रणाबाहेर गेलेली साखर इतकेच समीकरण दृढ झाले होते. पण आता मधुमेहाचा मेदाशी जास्त संबंध आहे, असे लक्षात आले आहे.

मधुमेद हा शब्द उच्चारला किंवा लिहिला की पहिल्यांदा डोक्यात येणारा विचार काय असतो? ‘ध’चा ‘द’ झालेला दिसतोय. एकदा ‘मधुमेद – दोन शत्रूंची युती’ अशी एक पोस्ट लिहिली होती. त्यावर एकदोन प्रतिक्रिया आल्या त्या बहुतेक ‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या शहरातून आणि ज्यांची ओळख साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश अशी असते अशा व्यावसायिकांकडून आलेल्या होत्या. त्यात लिहिले होते, ‘पोस्ट बरी आहे. गुगलवरून माहिती शोधण्याचे प्रयत्न दिसून येतात. शुद्धलेखनातील चुका टाळणेही मराठी भाषेच्या संवर्धनासाठी आवश्यक आहे. ऑटोकरेक्ट नावाचा पर्याय बंद करा. ‘ध’चा ‘द’ झाला आहे. ‘ध’चा ‘मा’ झाल्याने काय घडले हे वाचावे. अर्थात या बदलांमुळे लिखाणाच्या दर्जात काही फार मोठी सुधारणा वगैरे होणार नाही हे मान्य करूनही निदान मराठी तरी सुधारावे म्हणून ही नम्र पोस्ट. काय होते की चुकून अशी पोस्ट आमच्याकडून रीपोस्ट झाली आणि कोणी त्यावरून टीका केली तर? असे होऊ नये म्हणून ही विनंती.’

काय सॉलिड प्रतिक्रिया होती. एकाच चेंडूवर सिंगल काढताना ओव्हरथ्रोच्या चार रन्स अशी ही प्रतिक्रिया.

‘मधुमेद’ असे लिहिताना तिथे ‘द’ हेच अक्षर अपेक्षित आहे. मधुमेह हा मधुमेद या रोगाचा उपप्रकार आहे. ज्यांच्या स्वादुग्रंथी (पॅनक्रिआज) मधून इन्सुलीन पाझरण्याचे प्रमाण कमी कमी किंवा बंद होणे या एकाच कारणामुळे रक्तातील साखर वाढते त्याला मधुमेह म्हणायला हवे. ज्याला टाईप वन डायबेटिस म्हणतात तो हा. आपल्या देशांत बहुतांश लोकांना होतो तो मधुमेद. याला मधुमेद म्हणण्याचे कारण असे की यांत इन्सुलिन जास्त प्रमाणात तयार होत राहते. यात खरा शकुनीमामा असतो तो मेद. म्हणून याला मधुमेद म्हणणेच योग्य.

मधुमेद या शब्दाशी एक मजेशीर दंतकथा जोडलेली आहे. व्हिक्टर मिनकोवस्की या डॉक्टरने एक प्रयोग केला. त्यात त्याने एका कुत्र्याचे पॅनक्रिआस निकामी केले आणि त्यामुळे कुत्र्याला मधुमेह झाला. यातून एक गोष्ट सिद्ध झाली की पॅनक्रिअ‍ॅसमधून असा काहीतरी पदार्थ निघतो जो मधुमेह न होण्यासाठी कारणीभूत ठरतो. पुढे बँटिंग आणि बेस्ट यांनी हेच संशोधन पुढे नेऊन पॅनक्रिअ‍ॅसमधून पाझरणाऱ्या पदार्थाचा म्हणजे इन्सुलिनचा शोध लावला.

त्या काळी मधुमेहाचे निदान करण्यासाठीची टेस्ट म्हणजे रुग्णाची लघवी चाखून ती गोड आहे किंवा नाही हे तपासणे. त्यासाठी वाइन टेस्टरसारखे वॉटर टेस्टर असत. रुग्णाची लघवी चाखून बघणे हाच या लोकांचा व्यवसाय असे. मिन्कोवस्कीने स्वत: लघवी चाखून बघितली आणि पॅनक्रिअ‍ॅस काढल्याने मधुमेह होतो हे सिद्ध केले. त्यातील दंतकथा अशी की या मिन्कोवस्कीला कोणतेही वास येत नसत. पुढे ४०-५० वर्षांनी मधुमेह आणि त्यातील गुंतागुंतीमागे (complications) मेद या घटकाचा किती मोठा वाटा असतो हे कळले. त्या वेळेस अनेकजण मेद हा घटक इतकी वर्षे इतका उपेक्षित का राहिला यावर विचार करू लागले. मेदाचा मधुमेहावरील प्रभाव हा साखरेपेक्षा खूप जास्त असतो हे लक्षात आले तेव्हा एक प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ म्हणाले की ‘मेदाची भूमिका माहीत नसल्यामुळे गेली कित्येक वर्षे फक्त साखरेवर संशोधन करण्यात वेळ आणि पैसा फुकट गेला.’ हे का झाले याचा लोक शोध घेऊ लागले. मधुमेह झाला की पेशींमध्ये जळण्यासाठी साखर उपलब्ध होत नाही. त्यासाठी मग मेद वापरला जातो. तो अपुरा पडतो आणि संपूर्ण जळत नाही. चुलीत सरपण घातले आणि ते पूर्ण जळले नाही तर नुसताच धूर होतो तसेच काहीसे होते. मेद पूर्ण न जळल्यामुळे कीटोन्स नावाचा पदार्थ तयार होतो. मधुमेहाच्या घातक परिणामांना हे कीटोन्स जबाबदार असतात. पॅनक्रिअ‍ॅस काढून टाकल्यामुळे लघवीतून जशी साखर वाहून जाते तसेच कीटोन्सही बाहेर पडतात. उसाच्या कारखान्याबाहेर मळीचा तीव्र, गोडूस वास येतो तसा कीटोन्समुळे लघवीला वास येतो.

मिन्सोवस्कीच्या जिभेला साखरेची चव कळली, पण त्याला वास येत नसल्यामुळे त्याला कीटोन्सचा वास येतोय हे समजले  नाही. त्यामुळे मधुमेह म्हणजे पॅनक्रिअ‍ॅसमधील पदार्थ आणि नियंत्रणाबाहेर गेलेली साखर इतकेच समीकरण दृढ झाले. लगेच बँटिंगने इन्सुलिन शोधून काढले. खरे तर इन्सुलिन आणि मेद यांचा संबंध, इन्सुलिन आणि साखर या संबंधापेक्षा खूप महत्त्वाचा आणि गुंतागुंतीचा आहे. इन्सुलिनमुळे रक्तातील साखर कमी करता येते, इन्सुलिनच्या वापरामुळे जीव वाचतो; ही गोष्ट इतकी रोमांचक होती की सर्व ऊर्जा ही साखर आणि इन्सुलिन यावरील संशोधनावर खर्च झाली. म्हणून तर ही मिन्कोवस्की दंतकथा बनून राहिला. असं म्हटलं जातं की मिन्कोवस्कीला वास येत असता तर मधुमेहाच्या संशोधनात आणि उपचारात, मेद दुर्लक्षित राहिला नसता आणि इतकी वर्ष, श्रम आणि पैसा जास्त चांगल्या पद्धतीने वापरता आला असता. ती नजरचूक किंवा याला नाकचूक म्हणू या, ती पुन्हा टाळण्यासाठी मधुमेद हाच शब्द योग्य वाटतो.

एकदा टीव्हीवर भीमसेन जोशींची मुलाखत चालू होती. बहुधा जी. एन. जोशी मुलाखत घेत होते. त्यात त्यांनी भीमसेनजींना विचारले की, तुम्ही जोडराग फारसे गात नाही याचं काय कारण? त्यांवर त्यांनी दिलेल्या उत्तराचा सारांश काहीसा असा होता, ‘जोडराग गाताना ते दोन राग सम प्रमाणात दिसायला हवेत. दोन्ही एकत्र गाताना एकमेकांचा आविष्कार वाढायला हवा. असे खूप कमी जोडराग आहेत. आजकाल होतं काय की गायक सांगतो की आता ‘काफी कानडा’ पेश करतोय आणि पेश होते फक्त कॉफी. कानडा आपला पाहुणा कलाकार.’

मधुमेद या शब्दांचा विचार करताना मला नेहमी वाटते की, ‘मधुमेद’ हा त्या काफी कानडा सारखा तर नाही ना? खूप मधुमेह आणि पाहुण्या कलाकारासारखा मेद. पण तसं काहीही नाही. हा आजार होण्यामध्येही मेदाचा वाटा मोठा आहे. त्यावरील उपचारातदेखील आता मेदावरील उपचार हे साखरेवरील उपचारांइतकेच जोमाने शोधले जात आहेत. या रोगाच्या गुंतागुंतीमध्येही मेदाची भूमिका महत्त्वाची असते.

मेद म्हणजे शरीरात जमा होणारी चरबी किंवा स्निग्ध घटक. यालाच बाळसं म्हणतात. ‘प्रौढत्वी निज शैशवास जपणे, बाणा कवीचा असे’ असे कवींचे वर्णन केले जाते, पण प्रौढ होताना जर बाळसं जपून ठेवले तर मात्र त्याच्या काव्यप्रतिभेचे आविष्कार दिसण्याऐवजी रोगाचे अहवाल दिसतात. या चरबीला स्निग्ध पदार्थ म्हटलेले कोणाला कळत नाही आणि चरबी म्हटलेले आवडत नाही. चरबी ही वाढत नाही तर एखाद्याला ती ‘चढते’. आपल्याला अनेक शब्द उच्चारायला ओशाळवाणे वाटते. संडासला किंवा परसाकडे जातो असं म्हणताना घाण वाटते पण टॉयलेटला जायचे असं म्हटलं की जरा स्वच्छ वाटतं. एकदा मी कोकणात जाताना एका हॉटेलमध्ये एक संवाद ऐकला. मुंबईची एक सुंदर, स्मार्ट मराठी मुलगी आणि तिचे नातेवाईक गाडीतून उतरले. ही मुलगी आणि तिची मैत्रीण झरझर पुढे आल्या. त्यांनी गल्ल्यावरील माणसाला विचारले, ‘‘अंकल लू कुठे आहे?’’ त्यावर त्याचा प्रश्न ‘‘कोण लू?’’ मग या मुलींनी विचारले, ‘‘रेस्टरूम कुठे आहेत?’’, यावर उत्तर ‘‘इथे रूम न्हाहीत.’’ तेवढय़ात तिची आई पुढे आली आणि तिने विचारले, ‘‘भाऊ, बाथरूम आहे का? आणि स्वच्छ आहे ना, पाणी आहे ना?’’ हे ऐकून त्याने कुठे जायचे हे सांगितले. त्या मुलींच्या चेहऱ्यावर मात्र ‘बाथरूम’मध्ये जायला लागले म्हणून ओशाळलेले भाव होते. रोज ज्याला आपण मध्या म्हणतो त्याचा एकदम मधुकरराव असा कोणी उल्लेख केला तर आपण दचकतो की नाही? म्हणून कोणाला काय म्हणतो हे खूप महत्त्वाचे असते.

कोणी म्हणेल नावात काय आहे? मला वाटते शेक्सपियरच म्हणून गेला आहे, ‘‘व्हॉट्स इन अ नेम? दॅट विच वुई कॉल अ रोज बाय एनी अदर नेम वुड स्मेल अ‍ॅज स्वीट.’’ पण नाव हे खूप गोष्टींवर प्रभाव टाकू शकते. मधुमेद हे नाव घेताच उपचारात मेद या घटकाचा विचार झाला का नाही हेही चटकन डोक्यात येते. तेव्हा मधुमेद ही शुद्धलेखनाची चूक नाही. खरे तर जेव्हा मधुमेह हा शब्द वापरला जातो तेव्हा हा एकदा झाला की कधीही न जाणारा आजार वाटतो. तेच शिकणाऱ्या डॉक्टरांच्या मनावर ठसते. मग मधुमेह कधीही बरा होणार नाही, इतकेच काय त्याला नियंत्रणात ठेवण्यासाठी लागणारी औषधेही कमी होणार नाहीत हा समज पक्का होत गेला. ज्या वेळेस त्याला मधुमेद म्हणू लागले तेव्हा त्याची प्रतिमा बदलली. तो बरा नाही तरी तीव्रता कमी होऊ शकते ही आशा लोकांच्या मनात पालवली. त्या दृष्टीने आहार, औषधे यांच्यात बदल केले जाऊ लागले. एकदा का आत्मविश्वास आला की आजाराची तीव्रता कमी होते, औषधे कमी होतात, की लोक पूर्ण ताकदीने प्रयत्न करतात आणि म्हणूनच मधुमेद आणि मधुमेह दोन्हींची तीव्रता कमी होऊ शकते. बहिणाबाईंची एक कविता आहे, ‘कशाला काय म्हणू नही’. त्यात त्या म्हणतात; ‘बिना कपाशीनं उले, त्याले बोंड म्हणू नही’ किंवा ‘धावा ऐकून अडला, त्याले पाय म्हणू नही’. त्यांच धर्तीवर म्हणायला हवे ‘मेदातून जल्मा आला, त्याले मधुमेह म्हणू नही’.
डॉ. नितीन पाटणकर – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 16, 2018 12:10 pm

Web Title: pancreas and diabetes causes diet treatments medical news in marathi
Next Stories
1 नियमित योगामुळे मेंदूच्या हानीस प्रतिबंध
2 मुले सतत गोड खात असतील तर ‘हे’ उपाय करुन पाहा
3 अॅमेझॉनच्या ग्रेट इंडियन सेलमध्ये तुम्हाला मिळतील ‘या’ खास ऑफर्स
Just Now!
X