स्वादुपिंडाच्या कर्करोगांच्या लक्षणांचे एका तासाच्या आत निदान करणारी रक्त चाचणी संशोधकांनी विकसित केली आहे. स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान हा रोग विकसित झाल्यानंतर होत असल्याने या रोगाचा उपचार करणे कठीण होते. या रक्तचाचणीची माहिती एसीएस नॅनो या नियतकालिकात प्रसिद्ध करण्यात आली आहे. या रक्तचाचणीचे परिणाम एका तासात मिळू शकतात. स्वादुपिंडाच्या कर्करोगाची अचानक लागण होत असल्याने अशा रोगाचे लवकरात लवकर निदान होण्यासाठी हे एक आवश्यक पाऊल आहे, असे अमेरिकेतील कॉलिफोर्निया विद्यापीठाचे साहाय्यक प्रकल्प शास्त्रज्ञ जीन लुईस यांनी सांगितले. रोगाची लागण झाल्याबाबत अनभिज्ञ असणाऱ्या रुग्णांसाठी ही रक्तचाचणी भविष्यात रक्तशर्करा तपासण्यासमान सोपी व्हावी असे आमचे ध्येय आहे, असे लुईस यांनी सांगितले.

रक्तामधील स्वादुपिंडाच्या कर्करोगाचे निदान करण्यासाठी संशोधक नवी पद्धती विकसित करीत असून यात एक्सोझोम्स या अतिसूक्ष्म जैविक संरचना मिळवणे आणि त्याचे विश्लेषण करणे याचा समावेश आहे. ही संरचना इतर पेशींप्रमाणे कर्करोगांच्या पेशींमधून मिळवता येते. एक्सोझोम्स मध्ये आढळणारे आनुवंशिक माहितीमुळे कर्करोगाचे निदान करता येते. परंतु एक्सोझोम्स अत्यंत सूक्ष्म आणि नाजूक असल्यामुळे त्यांना रक्तापासून वेगळे करणे कठीण होते. एक्सोझोम्स मिळविण्याची सध्याची पद्धतीत वेळ जास्त जातो त्याचप्रमाणे रक्ताच्या नमुन्यांवर प्रक्रिया करण्याची गरज भासते. नव्या चाचणीमध्ये काही मिनिटांमध्ये रक्तातून एक्सोझोम्स वेगळे करणे शक्य झाले आहे. आम्ही रक्ताच्या नमुन्यांवर कोणतीही प्रक्रिया न करता त्यांची चाचणी करू शकतो, असे लुईस यांनी सांगितले.