News Flash

लहानग्यांच्या मधुमेहाची अशी घ्या काळजी…

आहाराबाबत जागरुकता गरजेची

टाईप १ आणि टाईप २ या मधुमेहांमध्ये फरक असा असतो. टाईप २ प्रकारात इन्सुलीन शरीरात असू शकते परंतु इन्सुलिनच्या कामात अडथळा येत असतो म्हणून साखर वाढत असते. तर टाईप १ प्रकारात इन्सुलिनची निर्मिती होत नसल्याने साखर वाढत असते. टाईप १ प्रकारात बाहेरून इन्सुलीन घेणे हे अत्यावश्यक असते आणि ते आयुष्यभर घ्यावेच लागते. हा मधुमेह बऱ्याचदा लहानपणापासूनच होतो. त्यामुळे लहान मुलांच्या बाबतीत काळजी घ्यावी लागते.

या मधुमेहाचे निदान नुकतेच झालेल्या मुलांच्या पालकांना आणि मुलांना भरपूर गोष्टी नवीन असतात. त्या नीट समजावून घेतल्या पाहिजेत. यात इन्सुलीन कसे द्यावे, इन्सुलीनचा काय उपयोग होतो, त्याचा डोस कसा ठरवायचा, रक्तातली साखर मोजणे, मुल आजारी पडले तर ती समस्या कशी हाताळावी, किटोनचा त्रास होऊ नये म्हणून काय करावे, आहार काय, कसा आणि किती असावा व आहाराचे मधुमेह नियंत्रित ठेवण्यासाठीचे महत्व, व्यायाम कोणता व किती करावा, अचानक साखरेचे प्रमाण खूप कमी झाल्यास काय करावे, शाळेत काय काय त्रास होऊ शकतो व त्या प्रमाणे वेळा कशा सांभाळायच्या, मानसिक ओढाताण व मधुमेह अशा अनेक गोष्टी तज्ञांकडून समजून घेणे महत्वाचे असते. यासाठी डॉक्टर व आहारतज्ञांचे मार्गदर्शन हा नियमित भाग असायला हवा.

आहार ठरवताना खालील गोष्टी लक्षात घ्याव्यात…..

१. दिवसभरातल्या नेहमीच्या जेवणात धान्य असावीत. यात सगळी धान्य चालू शकतात. त्यातल्या त्यात गहू, बाजरी उत्तम. नाचणी ज्वारी मुळे थोडी साखर वाढू शकते असं जरी असल तरी त्या बरोबर कोबी, गाजर किंवा पालेभाज्या खाल्या तर आजिबात साखर वाढत नाही.

२. नुसता वरण भात खाण्यापेक्षा त्याबरोबर पालेभाज्या आणि सलाड असेल तर भाताचा चांगला परिणाम होऊ शकतो. उदा.भात बनवताना त्यात मोडाचे सालीसकट मुग आणि कोबी, गाजर घातले व पालेभाजी बरोबर खाल्ला तर भात रोज सुद्धा खाऊ शकता.

३. ओटस अतिशय उत्तम. मैदा हा टाळावा. जुना बटाटा टाळावा. मध टाळावा. सर्व डाळी व कडधान्य खावीत. रोजच्या आहारात किमान ३ वेळा तरी डाळ किंवा कडधान्य किंवा अंड्याचा पांढरा भाग खावे. याचा मधुमेहासाठी अत्यंत चांगला उपयोग होतो.

४. चरबीयुक्त पदार्थ टाळलेले जास्त चांगले. बटर, साय, तूप, लोणी, चीज यांचा वापर अत्यंत कमी प्रमाणात करावा. जेवणातल्या तेलाचा अतिरेकी वापर टाळावा. तळलेल्या पदार्थांपेक्षा बेक केलेले, ग्रील केलेले पदार्थ उत्तम.

५. फळांचा वापर रोज करावा. यात अती गोड फळे टाळलेली बरी. उदा..केळी, सीताफळ, पपई, चिकू, आंबा. परंतु ही फळे आजिबात खायची नाहीत असे नाही. थोडी चालतात. रोजच्या आहारात सफरचंद, पेअर, संत्र, मोसंब, जांभूळ, वापरू शकता.

६. गोड पदार्थ टाळावेत. साखर कोणत्यातरी पदार्थाचा भाग म्हणून घातलेली चालू शकते. उदा…आपण भाजीत थोडा गूळ किंवा साखर घालतो ते चालते. परंतु गोड पदार्थ टाळावेत. ज्यूस बिना साखरेचा घ्यावा.
मिठाचा अति वापर टाळावा.

७. मधुमेही लोकांसाठी विशेष मिठाई आणि बिस्किटे बाजारात मिळतात. परंतु हे पदार्थ चालतात असे ठरवून त्याचा अतिरेकी वापर टाळला तर जास्त उत्तम.

८. आहार नियंत्रण, व्यायाम व इन्सुलीनचा नीट डोस व सकारात्मक दृष्टीकोन असेल तर मधुमेही व्यक्ती अतिशय सामान्य आयुष्य जगू शकते. आज गोड खाल्ले किंवा जास्त जेवण केले म्हणून आपल्या मनाने इन्सुलिनचा डोस वाढवू नये. दुसऱ्या दिवशी साखर तपासून डॉक्टरांना विचारल्याशिवाय हा प्रकार टाळावा.

९. इन्सुलीनचे बरेच प्रकार असतात. त्याची काम करण्याची पद्धत आपल्याला माहित नसेल तर त्याचा उलट परिणाम होऊन साखर अति कमी होऊन त्रास होऊ शकतो. आपल्या डॉक्टर कडून आपल्या पाल्याला कोणत्या प्रकारचे इन्सुलीन चालू आहे, ते नक्की शरीरात जाऊ कोणत्या स्वरुपात काम करते याची नीट माहिती समजून घ्यावी.

१०. पाल्याच्या शाळेत त्याच्या शिक्षकांना मुलाला मधुमेहाच असल्याची कल्पना देऊन ठेवावी. कधी कधी सारखी लघवीला लागू शकते. अशावेळी शाळेत बाईंना माहिती नसेल तर पाल्याला मानसिक तणावातून जावे लागते. पाल्याला इन्सुलीन शाळेत घ्यावे लागत असेल तर तशी कल्पना शाळेला देऊन ठेवावी. म्हणजे शाळेतल्या लोकांचे पाल्याला सहकार्य मिळू शकते व पाल्य इन्सुलीन घेणे टाळणार नाही.

११. या मुलांच्या मनावर मानसिक तणाव जास्त असतो. या साठी शाळेतील लोक, घरातील मंडळी यांचा सकारात्मक दृष्टीकोन फार महत्वाचा ठरतो. इन्सुलीन घेण्याव्यतिरिक त्याचे आयुष्य अतिशय नॉर्मल असते हे पाल्याला जाणवून द्यावे. सकारात्मक दृष्टीकोन आयुष्यात बऱ्याच गोष्टी लीलया करायला शिकवतो.

१२. मधुमेह आहे म्हणून पाल्याचे कोणतेच खेळणे आजिबात बंद करू नये. त्याला सगळ्या मुलांमध्ये मिसळून खेळू द्यावे. त्याला कोणती मोठी जखम होऊ नये यासाठी अनवाणी न खेळता नेहमीच बूट घालावते. त्याला स्वतःची काळजी घ्यायला शिकवावी. परंतु खेळ चालू ठेवावा. एखाद्या विशिष्ठ खेळात पाल्य प्राविण्य मिळवत असेल तर त्याला प्रोत्साहन देऊन त्याला खेळू द्यावे. फक्त त्याचा खाण्या पिण्याचा नीट विचार करावा व तसा आहार त्याला द्यावा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 16, 2017 10:00 am

Web Title: parents should take care of diabetic child type 1 type 2 diet
Next Stories
1 अ‍ॅस्पिरिनच्या रोजच्या वापराने शरीरात रक्तस्राव
2 होणाऱ्या नवऱ्याकडून काय आहेत भारतीय मुलींच्या अपेक्षा ?
3 चष्मा वापरताना ‘या’ गोष्टींचा विचार करा, नाहीतर…
Just Now!
X