आवडीच्या कारची प्रतीक्षा ६० दिवसांपर्यंत

अजय महाडिक

करोनाच्या टाळेबंदीचे शिथिलीकरण सुरू असताना वाहन उद्योगासाठी चांगली बातमी आहे. वाहनांच्या विक्रीत चांगली वाढ झाली असून सणासुदीचा काळ त्यास कारणीभूत असल्याचे वाहन विक्रेते राहुल आंब्रे यांनी सांगितले. मागील काही दिवसांपासून कार खरेदीची योजना आखणारे उस्मान सिद्दीकी यांनी सांगितले की, त्यांच्या आवडीच्या कारची प्रतीक्षा यादी ४५ दिवसांपासून दोन महिने अशी आहे.

गाडय़ांच्या मागणीत वाढ झाल्याने पुरवठय़ावर परिणाम जाणवत आहे. मागणी वाढल्याने अनेक नामांकित कंपन्यांनी सूट देणेही कमी केले आहे. एकंदर पूर्ण देशातच गाडय़ांचा व्यवसाय पूर्वपदावर येताना दिसत आहे. टाळेबंदीच्या काळातील या व्यवसायावरील मळभ दूर होताना दिसत आहे. सोसायटी ऑफ इंडिया मॅन्युफॅक्चर्स यांच्या माहितीनुसार, गतवर्षीच्या तुलनेत यंदा प्रवासी गाडय़ांच्या विक्रीत २६.५ टक्के वृद्धी दिसत आहे. तसेच जुलै ते ऑक्टोबर या काळात कारच्या विक्रीत १६ टक्के वाढ झाली आहे. व्यावसायिक गाडय़ांच्या विक्रीत याच काळात २०.१ टक्के घसरण झाल्याची नोंद केली आहे.

बाजारात गत दोन-तीन महिन्यांपासून गाडी खरेदी इच्छुकांच्या नोंदी वाढल्या होत्या, मात्र प्रत्यक्ष मागणीचा आलेख निराशाजनक होता. मात्र आता कोविडमुळे सुरक्षेचा विचार करून गाडय़ांच्या प्रत्यक्ष खरेदीच्या नोंदी वाढल्या आहेत. सणासुदीच्या काळात मागणी व प्रत्यक्ष खरेदीमध्ये झालेली वाढ नक्कीच ऑटोमोबाइल इंडस्ट्रीमध्ये संधी निर्माण करणारी ठरत आहे. मात्र दिवाळीनंतरचा काळ हे चित्र आणखी स्पष्ट करणारा ठरणार आहे. जानेवारी ते मार्च या काळात जर खरेदीचा उत्साह काय राहिल्यास खऱ्या अर्थाने ऑटो इंडस्ट्रीला अच्छे दिन असे म्हणता येईल.

नेक्सा, ब्रेझाला टक्कर

निसान मॅग्नेट सध्या सर्वाधिक चर्चेत आहे. गत महिन्यात बाजारात दाखल झालेली ही कार सब ४ मीटर एसयूव्ही आहे. या कारची टक्कर टाटा निक्सॉन, फोर्ड इकोस्पोर्ट, टोयोटा अर्बन क्र झर, मारुती ब्रेझा व ुंदाई व्हेन्यूशी होईल. निसान मॅग्नेटच्या इंटिरिअरमध्ये सेगमेंट फर्स्ट असणारा ७.० टीएफटी इंस्टरमेंट इंसोल युनिट आहे. जो या सेगमेंटमधील कोणत्याही कारमध्ये नाही. यासह अनेक आकर्षक फीचर्स आहेत. याशिवाय निसान मॅग्नेटची किंमतही या सेगमेंटमधील सर्व कारना स्पर्धा ठरणार आहे. तिची एक्स शोरूम किंमत ५.५ लाख असणार आहे.

टाटा अल्ट्रॉजची एक्सएम +

टाटा मोटर्सने यापूर्वीच अल्ट्रॉज प्रीमिअर हॅचबॅक बाजारात आणली होती. आता याच मॉडेलचे एक्सएम+ वेरियंट बाजारात आणले आहे. या वेरियंटची दिल्लीस्थित एक्स शोरूम किंमत ६.६ लाख असणार आहे. टाटा मोटर्सकडून अल्ट्रोजला पाच व्हेरियंटमध्ये उपलब्ध केले आहे. एक्सई, एक्सएम, एक्सटी, एक्सझेड आणि एक्सझेड-ओ. या कारच्या बेस एक्सईमध्ये डबल बॅरल हँडलॅप्स, स्टील व्हिल्ससोबत हब कॅप, डॅशबोर्डवर क्रोम फिनिशिंग, चार इंचांचा एलईडी इन्स्टूमेंट कन्सोल व स्टिअयिरग व्हील असे फीचर्स दिले आहेत.

मिनी जॉन कूपर..

मिनी जॉन कूपर वर्क्‍स जीपीकडून प्रेरणा घेऊन एक गाडी भारतात लाँच केली आहे. हिची किंमत ४६.९० लाख असणार आहे. भारतात विक्रीसाठी कंपनीने फक्त १५ कार्सना परवानगी दिली आहे. या कार भारतात पूर्णपणे आयात केल्या आहेत. ही कार मॉडेल मिनी जॉन कूपर वर्क्‍स जीपीला सन्मान देण्यासाठी तयार केली आहे. या गाडीला रेसिंग ग्रे मेटॅलिक रंग दिला आहे.

टाटा मोटर्सची ‘कॅमो’

दिवाळीच्या मुहूर्तावर टाटा मोटर्सकडून आपल्या महागडय़ा एसयूव्हीचा ‘कॅमो’ हे नवे कार प्रदर्शीत केली आहे. या एसयूव्हीची एक्स शोरूम किंमत १६.५० लाख आहे. कॅमो एडिशनला टाटा हॅरियरच्या एक्सटी व्हेरियंटमध्ये मॅन्युअल ट्रान्समिशनसोबत एक्सझेड व्हेरियंटमध्ये ऑटोमॅटिक ट्रांसमिशनसोबत प्रदर्शीत केली आहे. खरे तर ‘कॅमो’ टाटा मोटर्सच्या सामान्य हॅरिअरचे रूपांतर म्हटले तरी वावगे ठरणार नाही. यात आतून-बाहेरून अनेक बदल पाहावयास मिळतात. मात्र कोणताही तांत्रिक बदल नाही.