फोटो, सेल्फी किंवा व्हिडिओ काढण्यास विमानात बंदी नसल्याचे नागरी हवाई वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) रविवारी, १३  सप्टेंबर रोजी स्पष्ट केले आहे. परंतु, प्रवाशांना फोटो किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंगसाठी विमानाच्या सुरक्षेला धोका पोहोचेल, व्यत्यय येईल किंवा गोंधळ निर्माण होईल अशाप्रकारची साधनं (गॅझेट्स) वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. यापूर्वी शनिवारी डीजीसीएने एखाद्या विमानातील प्रवासी विमानाच्या आत छायाचित्रे घेत असल्याचे आढळल्यास त्या मार्गावरील विमानोड्डाण दोन आठवडय़ांसाठी स्थगित केले जाईल, असे सांगितले होते.

अभिनेत्री कंगना रनौत 9 सप्टेंबर रोजी मुंबईत परतत असताना विमान प्रवासादरम्यान माध्यम प्रतिनिधींमध्ये तिच्या फोटो आणि व्हिडिओसाठी झालेल्या कथित गोंधळानंतर डीजीसीएने विमानोड्डाण दोन आठवडय़ांसाठी स्थगित करण्याचा आदेश काढला होता. प्रवासी विमानात, विमान टेक-ऑफ किंवा लँड होत असताना फोटो आणि व्हिडिओग्राफी करु शकतात. परंतु, विमानाच्या सुरक्षेला धोका पोहचेल अशा कोणत्याही प्रकारची साधनं वापरण्यास मनाई आहे. त्याचप्रमाणे व्हिडिओग्राफी करताना विमान प्रवासात अडथळा येऊ नये किंवा कोणत्याही प्रकारचा गोंधळ निर्माण होऊ नये, याची खबरदारी घेणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या प्रवाशांविरुद्ध योग्य ती कारवाई केली जाईल , असे डीजीसीएकडून स्पष्ट करण्यात आले आहे.


अभिनेत्री कंगना राणौत प्रवास करत असलेल्या इंडिगोच्या चंदीगड- मुंबई विमानात पुढच्या रांगेत बसलेल्या कंगनाची प्रतिक्रिया घेण्यासाठी माध्यम प्रतिनिधींनी सुरक्षेचे तसेच सामाजिक अंतराच्या नियमांचे कथित उल्लंघन केल्याचे आढळल्यानंतर, डीजीसीएने इंडिगो एअरलाइन्सला ‘योग्य ती कारवाई’ करण्यास सांगितले होते. त्यानंतर डीजीसीएने विमान नियमावली १९३७च्या नियम १३ अन्वये, डीजीसीए किंवा हवाई वाहतूक मंत्रालयाच्या परवानगीशिवाय कुणाही व्यक्तीला विमानाच्या आत कुठलेही छायाचित्र काढण्यास परवानगी नाही, असे सांगत विमानाच्या आत छायाचित्रे घेत असल्याचे आढळल्यास त्या मार्गावरील विमानोड्डाण दोन आठव ड्यांसाठी स्थगित केले जाईल, असे सांगितले होते.