24 September 2020

News Flash

पाणी शुद्धता तपासण्यासाठी स्वस्त चाचणी

पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक भाग असून त्याचा पुरेसा पुरवठा महत्त्वाचा असतोच पण पाणी पिण्यालायक असावे लागते.

| March 28, 2015 01:32 am

अशुद्ध पाण्यामुळे हजारो लोक दरवर्षी मृत्युमुखी पडतात. त्यासाठी आता जलशुद्धीकरण यंत्रेही उपलब्ध आहेत पण खरोखर त्यामुळे पाणी शुद्ध होते की नाही याची चाचणी करणारा संच पंजाबच्या कृषी विद्यापीठाने शोधून काढला असून तो अतिशय स्वस्तही आहे. पाणी तपासण्याचा हा संच वापरण्यासही सोपा असून तो येथील किसान मेळ्यात सादर करण्यात आला.
पाणी हा आपल्या जीवनाचा आवश्यक भाग असून त्याचा पुरेसा पुरवठा महत्त्वाचा असतोच पण पाणी पिण्यालायक असावे लागते. आपण जे पाणी पितो ते स्वच्छ आहे की नाही हे कसे तपासणार, तर त्याचे उत्तर म्हणून पंजाब कृषी विद्यापीठाने पाणी तपासण्याचा संच म्हणजेच यंत्र तयार केले आहे. पिण्यासाठी शुद्ध पाणी मिळण्याचा अधिकार हा आता मानवी अधिकारात समाविष्ट असून जगातील लोकांपैकी एक षष्ठांश लोकांना पिण्याचे शुद्ध पाणी मिळत नाही.जागतिक आरोग्य संघटनेच्या माहितीनुसार किमान ८० टक्के आजार हे प्रदूषित, सांडपाणी मिसळलेल्या व प्रदूषित पाण्यामुळे होतात. भारतात २१ टक्के साथीचे रोग हे पाण्यामुळे होतात. अतिसाराचा त्यात समावेश असून पाच वर्षे वयापर्यंतची किमान २५-३० टक्के मुले त्यामुळे मरतात. ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता पाणी तपासण्याची सोय असणे आवश्यक होते. पंजाब कृषी विद्यापीठाच्या सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या संशोधकांनी तयार केलेले हे उपकरण साधे, कुठेही नेण्यासारखे जीवाणू तपासणी करणारे यंत्र आहे, त्याची किंमत अवघी ४० रुपये आहे.

संच वापरायचा कसा
*अॅल्युमिनियमचे भेंडोळे कापून मोकळे करा आणि रबर स्टॉपर जसेच्या तसे ठेवा.
*हे यंत्र जलस्रोताजवळ उघडा व पाण्याचा नमुना त्यातील बाटलीत घ्या बाटलीवर १५ मि.लि.ची खूण आहे. तेथपर्यंत पाणी घ्या.
*यंत्र २४ तास उबदार जागेत ठेवा.
*पाण्याचा रंग बदललेला दिसला तर त्यात अशुद्धता आहे असे समजा,
*नंतर या यंत्रात डेटॉल किंवा जंतूनाशक घालून त्याची विल्हेवाट लावा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 28, 2015 1:32 am

Web Title: pau develops kit to test purity of drinking water
Next Stories
1 अवकाळी पावसामुळे रानमेवा दुर्मीळ
2 आजच्या तरूणांचा कल लग्नानंतर वेगळे राहण्याकडे
3 उपवासासाठी ‘खजूर मिल्क शेक’
Just Now!
X