आजकालच्या स्पर्धात्मक जगात वावरताना आपल्याकडे एकवेळच्या जेवणासाठीही वेळ नसतो. त्यामुळे अनेकदा आपण झटपट तयार होणाऱ्या फास्ट फूड किंवा जंक फूडवर आपले जीवन व्यतित करतो. हा आहार आपल्या शरीराला अत्यंत घातक आहे. परंतु कितीही प्रयत्न केले तरी फास्ट फूड खाण्याची सवय काही सुटत नाही. अशा न सुटणाऱ्या सवयींवर नियंत्रण मिळवण्यासाठी एक गॅजेट बाजारात आले आहे.

या गॅजेटला पाव्हलॉक ब्रेसलेट असे म्हटले जाते. हे ब्रेसलेट घातल्यानंतर जेव्हा कधी आपण जंक फूडचे सेवन करू, तेव्हा आपल्याला विजेचा झटका लागेल. जंक फूड व्यतिरिक्त दारू पिणे, धूम्रपान करणे, नखे कुरतडणे, ऑनलाईन वेळ वाया घालवणे, जास्त झोपणे यांसारख्या सवयींवरही नियंत्रण मिळवण्यासाठी पाव्हलॉक ब्रेसलेट मदत करते असा दावा करण्यात आला आहे.

आपल्या व्यसनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पाव्हलॉक ब्रेसलेटची निर्मित करण्यात आली आहे. निर्मात्यांच्या सांगण्यनुसार ज्यावेळी माणसं व्यसन करतात, त्यावेळी शरीरामध्ये ठराविक कंपनं निर्माण होतात.  हे गॅजेट आपल्या शरीरात निर्माण होणाऱ्या या कंपनांच्या आधारे काम करते. व अशावेळी विजेसारखा सौम्य झटका बसतो. हे गॅजेट आपण घड्याळाप्रमाणे आपल्या मनगटावर बांधू शकतो. हे गॅजेट वापराआधी किमान तीन तास चार्ज करावे लागते. पाव्हलॉक नामक मोबाईल अ‍ॅप्लिकेशनच्या मदतीने हे गॅजेट अक्टिव्हेट होते. हे अ‍ॅप्लिकेशन अँड्रॉइड व आयओएस या दोन्ही प्रकारच्या ऑपरेटिंग सिस्टमवर काम करते. हे ब्रेसलेट अक्टिव्हेट केल्यानंतर पाव्हलॉक अ‍ॅपमध्ये आपल्याला विविध पर्याय उपलब्ध होतात. या पर्यायांच्या माध्यमाधून आपल्या गरजेप्रमाणे हे गॅजेट वापरता येते. सध्या पाव्हलॉक ब्रेसलेट फक्त ऑनलाईन उपलब्ध आहे. अ‍ॅमेझॉनवर या ब्रेसलेटची किंमत १८ हजार ८८७ रुपये इतकी आहे.