करोनामुळे देशभरात घरातच लॉकडाउन झालेल्या जनसामान्यांना आर्थिक दिलासा मिळावा म्हणून अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी ‘प्रधानमंत्री जनधन योजने’अंतर्गत विशेष पॅकेजची घोषणा केली. हे पैसे खातेधारकांना मिळवून देण्यासाठी पे पॉइंट इंडियाने सहकार्याचे पाऊल उचलले असून, देशभरातील पे पॉइंटच्या मायक्रो एटीएम आणि दुकानांतील स्वाईप मशिनच्या माध्यमातून काढता येणार आहेत.

केंद्र सरकारनं ‘जनधन योजने’त जमा केलेले पैसे खातेधारकांना काढण्यासाठी बँकेत किंवा एटीएममध्ये जावे लागणार आहे. मात्र सध्याच्या लॉकडाउनस्थितीमध्ये कित्येक ठिकाणी बँकांपर्यंत जाण्याची व्यवस्था नाही. ग्रामीण भागात ही दुविधा मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे कित्येकांना योजनेचा लाभ मिळूनही पैसे मात्र मिळण्यात अडचणी येत होत्या. पण आता ’पे पॉइंट’ या देशभरात पसरलेल्या आर्थिक सेवा देणार्‍या संस्थेने याकामी सहकार्याचा हात पुढे केला असून, त्यामुळे योजनेच्या लाभार्थींना घराजवळच्या कोणत्याही दुकानातून पे पॉइंट संचलित मिनी एटीएम, आधार संलग्नीत किंवा ‘स्वाईप’ मशिनमधून आपले पैसे मिळवता येतील.

कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगामुळे जेव्हा संपूर्ण देशच घरात बंद आहे अशावेळी सर्वसामान्यांना त्यांच्या दैनंदिन बाबींकडे लक्ष देता यावे, आर्थिक व्यवहार सहज करता येणे गरजेचे आहे. अशावेळी बँकेमध्ये किंवा एटीएममध्ये जाता येणे कठिण होते, त्याचप्रमाणे ग्रामीण भागात बँक शाखा व एटीएम यांची उपलब्धता कमी असते. त्यामुळे देशभरातील ग्रामीण भागामध्ये पे पॉइंटने 42 हजाराहून अधिक ऑफलाइन स्टोअर्स उपलब्ध करून दिल्यामुळे लॉकडाउनच्या काळात याचा फायदा ग्रामीण भारताला मोठ्या प्रमाणात होऊ शकतो, असा विश्वास पे पॉइंटचे व्यवस्थापकिय संचालक केतन दोशी यांनी व्यक्त केला.