पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीनंतर ई-व्यवहारांना मोठ्या प्रमाणात चालना दिली. त्यामुळे Paytm, Bhim ही अॅप्लिकेशन्स वापरणाऱ्यांची संख्या वाढली. कमी कालावधीत हजारो जण या अॅप्लिकेशन्सचा वापर करु लागले. विशेष म्हणजे यामुळे लोकांचे आर्थिक व्यवहार अतिशय सोपे झाले. मोबाईलच्या एका क्लिकवर अनेक गोष्टी शक्य झाल्याने युजर्सचे अनेक ताण वाचले. याशिवाय Paytm सारख्या ई-वॉलेट अॅप्लिकेशन्समधून देण्यात येणाऱ्या सुविधा युजर्ससाठी फायद्याच्या ठरत आहेत. नव्या वर्षात Paytm ने आपल्या युजर्ससाठी एक आनंदाची बातमी दिली आहे.

जे ग्राहक १ लाखांहून जास्त रक्कम आपल्या Paytm च्या खात्यात जमा करतील. त्यांची १ लाखाच्या पुढच्या रकमेची Paytm कडून एफडी केली जाणार आहे. बँकेमध्ये एफडीवर ज्याप्रमाणे व्याज मिळते त्याचप्रमाणे Paytm कडून युजरला व्याज देण्यात येणार आहे. हे व्याज वर्षाला ६.८५ टक्के इतके असेल. आता एफडी म्हटल्यावर ही रक्कम आपण काढू शकत नाही असा आपला समज होईल. मात्र तसे नसून आपल्याला लागेल तेव्हा ही रक्कम आपण काढून घेऊ शकतो.

या सुविधेसाठी Paytm ने इंड्सइंड बँकेसोबत करार केला आहे. ग्राहकाकडून जमा करण्यात आलेली रक्कम एक लाखांपेक्षा अधिक झाल्यास आपोआप ती रक्कम एफडीमध्ये बदलली जाईल असं कंपनीने म्हटलं आहे. ग्राहकांनी आपली ही रक्कम कधीही काढल्यास त्यासाठी ग्राहकांकडून कोणत्याही प्रकारचा दंड किंवा चार्ज घेतला जाणार नाही. या योजनेमध्ये वरिष्ठ नागरिकांना जास्त व्याजदर दिला जाणार असल्याचेही कंपनीने स्पष्ट केले आहे.

पेटीएमने आपल्या युजर्ससाठी अनेक योजना सुरु केल्या आहेत. कंपनीकडून वरिष्ठ नागरिकांनासाठी खास योजना सुरु केली आहे. या योजनेत वरिष्ठ नागरिकांना अधिक व्याजदर मिळणार आहे. जर ग्राहक मॅच्योरिटी काळापूर्वी वरिष्ठ नागरिक झाल्यास त्याचं अकाऊंट आपोआप सिनिअर सिटीजन स्किममध्ये ट्रान्सफर होईल अशी माहिती कंपनीतर्फे देण्यात आली आहे. त्यामुळे बँकेप्रमाणे आता एटीएममध्येही व्याज मिळत असल्याने युजर्सच्या दृष्टीने हे फायद्याचे आहे. जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा फायदा घ्यावा तसेच जास्त पैसे Paytm मध्ये ठेवावेत यासाठी Paytm ने लढवलेली ही शक्कल आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.