ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणारे पेटीएम हे  अॅप गुगलने आपल्या प्ले स्टोअरवरुन काढून टाकले आहे. गुगलने यासंदर्भात स्पष्टीकरण देताना या अॅपच्या माध्यमातून खेळांसंदर्भातील नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावून जुगार खेळण्यासाठी परवानगी देत नाही, असं म्हटलं आहे. त्याचप्रमाणे कसिनोसारख्या सेवा पुरवणे नियमांमध्ये बसणारे नाही असंही गुगलने स्पष्ट केलं आहे. गुगलने पेटीएम फॉर बिझनेस, पेटीएम मॉल, पेटीएम मनी याचबरोबर कंपनीच्या अन्य अ‍ॅपवरही कारवाई केली आहे. यासंदर्भात पेटीएमने सध्या कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या प्रकरणामध्ये चौकशीनंतर कंपनीकडून अधिकृतपणे पत्रक जारी करण्यात येणार आहे. हे अ‍ॅप्लिकेशन आता फक्त अ‍ॅपलच्या अ‍ॅप स्टोअरवर डाऊनलोडसाठी उपलब्ध असेल.

गुगलने यासंदर्भात आपल्या ब्लॉगमध्ये माहिती दिली आहे. लाखो युझर्स असणाऱ्या पेटीएमवर कारवाई करण्यामागे कंपनीने ऑनलाइन जुगारासंदर्भातील नियमांचे कारण दिलं आहे. “आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं आहे.

“ज्या गोष्टींमुळे आर्थिक फसवणूक होऊ शकते अशा गोष्टींपासून आमच्या युझर्सचे संरक्षण व्हावे असे आमचे नियम आहेत. एखाद्या अ‍ॅपने याचे उल्लंघन केल्यास आम्ही त्यासंदर्भातील नियमांची माहिती अ‍ॅपच्या डेव्हलपर्सला देतो. यासंदर्भातील इतर कायदेशीर माहिती आणि नियम अ‍ॅप निर्माण करणाऱ्या कंपन्यांना सांगितली जाते. मात्र अनेकदा सांगितल्यानंतरही नियमांचे उल्लंघन करणाऱ्या अ‍ॅपवर आम्ही कारवाई करतो. यासंदर्भात आम्ही या कंपनीचे गुगल प्ले डेव्हपर अकाऊंट बंद करण्यासारखी गंभीर कारवाईही करु शकतो. आपल्या प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या सर्व डेव्हलपर्सला हे नियम लागू होतात,” असं गुगलने म्हटलं आहे.