ऑनलाइन व्यवहारांसाठी वापरले जाणाऱ्या पेटीएमने गुगलला टक्कर देण्यासाठी थेट स्वत:चे अ‍ॅण्ड्रॉइड मिनी अ‍ॅप स्टोअर सुरु केले आहे. भारतीय अ‍ॅप डेव्हलपर्ससाठी हा प्लॅटफॉर्म उपलब्ध करुन देत पेटीएमने थेट गुगलला आव्हान देण्याचा निर्णय घेतलाय. हे मिनी अ‍ॅप्स हे सामान्य अ‍ॅप्सप्रमाणे नसतील. हे अ‍ॅप्स वेब बेस अ‍ॅप्स असतील. म्हणजेच या अ‍ॅपवर गेल्यावर तुम्हाला एखाद्या वेबसाईटवर गेल्यासारखंच वाटेल. या अ‍ॅप्सच्या मदतीने युझर्सला त्यांचा डेटा आणि मेमरीही वाचवता येईल असा दावा पेटीएमने केला आहे.

या अ‍ॅपमध्ये पेमेंट करण्याच्या पर्यायांमध्ये पेटीएम वॉलेट, पेटीएम पेमेंट बँक आणि शून्य टक्के शुल्क आकारणीवर युपीआय पेमेंटचा पर्याय उपलब्ध करुन देण्यात आला आहे. मात्र या माध्यमातून क्रेडिट तसेच डेबिट कार्ड आणि नेट बँकिंगने पेमेंट करताना कंपनी दोन टक्के अतिरिक्त शुल्क आणि जीएसटी आकारणार आहे. काही आठवड्यांपूर्वी गुगलने नियमांचे उल्लंघन करत असल्याचे कारण देत पेटीएम आपल्या प्ले स्टोअर या प्लॅटफॉर्मवरुन हटवले होते. “आम्ही ऑनलाइन कसिनो किंवा नियमांचे उल्लंघन करुन खेळांवर पैसे लावण्यासाठी पुरवण्यात येणारी जुगाराची सेवा देणाऱ्या अ‍ॅपला परवानगी देत नाही. एखाद्या ग्राहकाला आपल्या प्लॅटफॉर्मवरुन बाहेरील वेबसाईटवर ऑनलाइन जुगारासाठी जाण्यास परवानगी देणारी सेवा उपलब्ध करुन देणाऱ्या अ‍ॅपचाही यामध्ये समावेश होतो. अशाप्रकारच्या देवाणघेवाणीमधून पैसे तसेच रोख रक्कम बक्षीस म्हणून देणे हे आमच्या नियमांच्या विरोधात आहे,” असं गुगलने आपल्या ब्लॉगमध्ये म्हटलं होतं.

गुगलच्या नव्या नियमांवर झोमॅटो आणि स्वीगीसारख्या कंपन्यांनीही नाराजी व्यक्त केली आहे. कारण गुगलनच्या नवीन नियमांनुसार खेळांवर आधारी स्पर्धांच्या माध्यमातून कॅशबॅकच्या ऑफर्स ग्राहकांना देणे चुकीचे आहे. खास करुन इंडियन प्रिमियर लीगच्या कालावधीमध्ये हा नियम अनेक कंपन्यांना फारसा पटलेला नाही. पेटीएमचे संस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष विकय शेखर शर्मा यांनी, “प्रत्येक भारतीय अ‍ॅप डेव्हलपरला संधी देणारे व्यासपीठ आम्ही उपलब्ध करुन देत आहोत याचा मला आनंद आहे. पेटीएम मिनी अ‍ॅप स्टोअर भारतातील तरुण डेव्हलपर्सला चालना देऊन पेमेंटसंदर्भातील नवीन माध्यमे शोधण्यासाठी फायद्याचे ठरेल. पेटीएमच्या युझर्सला ही सेवा वापरण्यासाठी वेगळं अ‍ॅप डाउनलोड करण्याची गरज नाही. त्यांना पेमेंट ऑप्शनमध्येच हे उपलब्ध होणार आहे,” असं सांगितलं.

पेटीएमच्या या प्लॅटफॉर्मचे भारतीय डेव्हलपर्सकडून स्वागत केलं जाईल असं जाणकार सांगतात. तसेच ही योजना आत्मनिर्भर भारत मोहिमेखाली येईल. मुख्य करुन सर्व पेमेंट आणि व्यवहार हे भारतीयांकडून भारतीयांना केले जाणार असल्याने या योजनेअंतर्गत या प्लॅटफॉर्मचा समावेश केला जाईल. लहान उद्योगजकांना आकर्षित करण्यासाठी पेटीएम या प्लॅटफॉर्मचा वापर करेल. एचटीएमएल आणि जावा स्क्रीप्टच्या मदतीनेही ही अ‍ॅप्स काम करतील असा कंपनीचा दावा आहे. दोन डेव्हलपर्सने या प्लॅटफॉर्मवरुन दोन आठवड्यात एक इंटीग्रेटेड अ‍ॅप बनवल्याचा दावाही कंपनीने केला आहे. 

स्थानिक विक्रेत्यांसाठी हे व्यासपीठ फायद्याचे ठरु शकतो. पेमेंटच्या सुविधेसाठी अधिक खर्च करण्यासाठी उत्सुक नसलेल्यांना हे फायद्याचे ठरेल. पेटीएमचे हे मिनी अ‍ॅप स्टोअर लॉन्च करण्याच्या वेळी यावर ३०० अ‍ॅप्स आहेत. यामध्ये डॉमिनोज, नेटमेड्स, डिकॅथलॉन, ओला, रॅपीडडू यासारख्या मोठ्या कंपन्यांचाही समावेश आहे.

पेटीएम ८ ऑक्टोबर रोजी डेव्हपर्स कॉन्फरन्स ठेवणार आहे. गुगल प्ले स्टोअरला पर्यायमधून उपलब्ध करुन दिलेली ही सेवा कसं काम करणार आहे यासंदर्भात कंपनी या कॉन्फरन्समध्ये सविस्तर माहिती देणार आहे. भारतीय अ‍ॅप मार्केटमध्ये सध्या गुगलचीच मत्तेदारी आहे. गुगल पेटीएमच्या या निर्णयानंतर काय करणार याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिलं आहे.