करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाउन जाहीर करण्यात आलं आहे. त्यानंतर केवळ अत्यावश्यक वस्तूंच्या सेवांना परवानगी देण्यात आली होती. Amazon, Flipkart सारख्या कंपन्यांनीही आपली सेवा काही काळासाठी बंद केली होती. त्यानंतर आता पुन्हा Amazon, Flipkart सह अन्य ई-काॅमर्स संकेतस्थळांची सेवा सुरू करण्यात येणार आहे. त्यानंतर ग्राहकांना मोबाईल फोन, टिव्ही, फ्रिज यांसारख्या ईलेक्ट्रॉनिक वस्तू खरेदी करता येणार आहेत. २० एप्रिल पासून या ई कॉमर्स कंपन्यांना सेवा देण्याची परवानगी देण्यात आली आहे. गृह मंत्रालयाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याकडून याबाबत माहिती देण्यात आली. दरम्यान, सेवा पुरवण्यासाठी सरकारनं आखून दिलेल्या गाईडलान्सचं पालन सर्वांना करावं लागणार आहे.
मोबाईल फोन, टिव्ही, लॅपटॉप आणि अन्य वस्तू २० एप्रिलपासून ई कॉमर्स कंपन्यांच्या संकेतस्थळावर विक्रीसाठी उपलब्ध होणार आहेत. परंतु या कंपन्यांच्या सामानांची वाहतूक करणाऱ्या वाहनांना संबंधित प्राधिकरणाची मंजुरी घेणं बंधनकारक करण्यात आलं आहं. बुधवारी जारी करण्यात आलेल्या नव्या सुचनेनुसार ठराविक कमर्शिअल आणि खासगी सेवांना लॉकडाउनच्या दुसऱ्या टप्प्यात सुट देण्यात आली आहे. यापूर्वी ई कॉमर्स कंपन्यांना केवळ जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करण्याची परवानगी देण्यात आली होती.
देशातील मोठ्या प्रमाणात लोक ई कॉमर्स कंपन्यांच्या लॉजिस्टीक आणि सामानांच्या पुरवठ्याच्या व्यवसायाशी जोडले गेलेले आहेत. या क्षेत्राला परवानगी दिल्यानं या क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना दिलासा मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, सर्वांना महत्त्वाचं म्हणजे सोशल डिस्टन्सिंगचंही पालन करावं लागणार आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 16, 2020 7:14 pm