सोमवार आला की आपल्या सगळ्यांनाच ऑफीसला जायचा कंटाळा येतो. ऑफीसमध्ये १० ते १२ तास काम करणे म्हणजे मानसिक आणि शारीरिकरित्या थकवणारे असते. कधी कामाचा ताण म्हणून तर कधी कामातून ब्रेक हवा म्हणून अनेक जण ऑफीसमध्ये सतत खाताना दिसतात. यातही चहा-कॉफी आणि जंक फूड खाण्याचे प्रमाण जास्त असते. कामाचे प्रेशर असल्याने घरी जायला उशीर, मग जेऊन झोपायला उशीर, मग सकाळी उठायला उशीर. त्यामुळे व्यायाम तर गणतीतच राहत नाही. अशी जीवनशैली आरोग्यासाठी अतिशय घातक असते. पण तुमचे ऑफीसमधले डाएटचे तुम्ही योग्य पद्धतीने नियोजन केल्यास त्याचा निश्चितच फायदा होतो. पाहूयात शिवानी दिक्षित यांनी दिलेल्या खास डाएट टिप्स

नाष्ता

नाष्ता हा  आपल्या आहारातील अतिशय महत्त्वाचा घटक आहे. नाष्त्यामुळे शरीराला उर्जा मिळण्यास तसेच दिवसभरासाठी त्याचे पोषण होण्यास मदत होते. नोकरी करणारे लोक सकाळी घर सोडण्याच्या घाईत असतात. त्यामुळे वेळ जाणार नाही आणि तरीही आरोग्यदायी असेल असा नाष्ता करावा.

१. केळे, किवी आणि दही

२. एक सफरचंद, मूठभर द्राक्षे आणि एक संत्रे

दुपारचे जेवण

तुम्ही कितीही घाईत असाल तरीही तुम्ही दुपारचे जेवण नीट करणे आवश्यक आहे. तुम्हाला घरातून जेवण सोबत घेणे अजिबातच शक्य नसेल तर तुम्ही विकत घेऊ शकता. पण जेवण न करणे मात्र आरोग्यासाठी चांगले नाही. आता दुपारचे जेवण घेताना त्यात काय खावे याबाबत स्पष्टता असायला हवी. यामध्ये तुम्ही खालील पर्यायांचा विचार करु शकता.

१. पास्ता सूप किंवा व्हेजिटेबल सूप, पोळीचा रोल आणि संत्रे

२. ओट्स क्रॅकर्स ४, चिज २ चमचे, एक वाटी दही

३. व्हेजिटेबल सँडविच, सॅलेड आणि सफरचंद

संध्याकाळचा नाष्ता

संध्याकाळी साधारण ६ ते ६.३० च्या दरम्यान आपल्याला भूक लागते. अशावेळी चिवडा, वेफर्स, चहा-बिस्कीट यांसारख्या गोष्टी खाऊन भूक मारली जाते. मात्र या वेळात चांगला पौष्टीक आहार घेणे आवश्यक असते. यातही तुम्ही घरात केलेले काही घेऊन आलात तर ठिक नाहीतर बाहेरचे खाणार असाल तर खालील पर्यायांचा विचार करु शकता.

१. रासबेरी

२. केळे

३. दही आणि एखादे फळ

४. फ्रूट सॅलेड

रात्रीचे जेवण

दिवसभरात एखादा जड पदार्थ खाल्ला तर ठिक आहे. पण रात्रीच्या वेळी अजिबात जड खाऊ नये. आरोग्य चांगले ठेवायचे असल्यासरात्री हलका आहार घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्ही खालील पदार्थांचा विचार करु शकता.

१. ३ अंड्यांचे ऑमलेट, यामध्ये अर्धा चमचा सूर्यफूलाच्या बिया, अर्धा कांदा, मशरुम, चवनुसार मिरची आणि मीठ

२. व्हेजिटेबल सूप. यामध्ये तुम्ही ब्रोकोली, टोमॅटो, गाजर, बीट अशा आरोग्यदायी भाज्यांचा वापर करु शकता.