मानवी कर्करोगाचे विश्लेषण करण्यासाठी वैज्ञानिकांनी एक सुविधाजनक प्रारूप तयार केले असून ते कोंबडीच्या अंडय़ावर आधारित आहे. त्याच्या मदतीने कर्करोगावर व्यक्तिविशिष्ट उपचार करणे शक्य होणार आहे. जपानमधील क्योटो विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे की, ‘चिकन एग टय़ूमर मॉडेल’ विकसित करण्यात आले असून त्यात कोंबडीच्या दहा दिवसांच्या भ्रूणाभोवतीचे पातळ आवरण बाजूला करून त्यात प्रक्रियाकृत कर्करोगयुक्त अंडपेशी टाकण्यात येतात.

अंडपेशीची गाठ तीन दिवसांनंतर पारपटलावर तयार होते. रुग्णांच्या कर्करोगयुक्त अंडपेशी घेतल्या तरी हाच परिणाम दिसतो.

मानवी कर्करोगाची प्रतिआवृत्ती तयार करून यात संशोधन चालू आहे. तीन दिवसात गाठ तयार झाल्याने हे प्रारूप अभ्यासासाठी उपयुक्त आहे, असे क्योटो विद्यापीठाचे फुयुहिको टमनोई यांनी सांगितले.

उंदरात अशी गाठ निर्माण करण्यासाठी जास्त काळ लागतो. यातून कर्करोग विरोधी औषधांच्या चाचण्या आता या प्रारूपाने लवकर शक्य होतील. एक आठवडय़ात व्यक्तिविशिष्ट औषधप्रणाली ठरवता येऊ शकते.

फ्रान्स व सौदी अरेबियाचे वैज्ञानिकही यात सहभागी होते. त्यांनी जैवविघटनशील सिलिका नॅनोकरण तयार केले आहेत त्याला जैवविघटनशील पीएमओ असे म्हटले जाते. त्यांचा आकार २०० नॅनोमीटर आहे. त्यांच्या मदतीने कर्करोगावरची औषधे चिकन एग प्रयोगातील मानवी अंडपेशींवर सोडता येतील त्यात डोक्सोरुबिसिन या औषधाची चाचणीही करण्यात आली.

या औषधाने कर्करोगाची गाठ अगदी चटकन नष्ट केल्याचे दिसून आले. यात इतर वाईट परिणामही कमी होतात.

चिकन एग प्रारूप खूप उपयोगाचे असून आधीचे उंदराचे प्रारूप जास्त वेळ घेणारे आहे.