परदेशी प्राण्यांना (एक्झॉटिक) पाळण्याच्या छंदाला प्रतिष्ठा मिळाली. मात्र, दुसरीकडे त्यावरील निर्बंध, त्यासाठीचे तोकडे पडणारे कायदे या सगळ्या संघर्षांतून या प्राण्यांची अवैध बाजारपेठ उभी राहिली. वेगवेगळ्या प्रजातीचे प्राणी, पक्षी आणायचे, त्याची निगुतीने काळजी घ्यायची, प्रजोत्पादन करायचे आणि हौशी पालकांना त्याची विक्री करायची, हा या बाजारपेठेचा मूळ साचा. प्राण्यांना वेगळ्याच वातावरणात आणून त्यांना रुळवणे यासाठी लागणाऱ्या इतर सर्व सुविधांचाही पसारा अनुषंगाने वाढला आहे. भारतीय प्रजातीचे वन्यजीव पाळण्यासाठी परवानगी नाही. मात्र आपल्याकडे जगातील अनेक प्रजातींचे प्राणी अवैध मार्गाने भारतात येऊन हौशी प्राणिपालकांच्या कैदेत आहेत. तसेच भारतीय प्राणी पाळण्यासाठीची असोशी परदेशात मोठय़ा प्रमाणात फोफावली आहे. त्याचेच एक उदाहरण म्हणजे आपला वाघ.

जंगलापेक्षा पिंजऱ्यातील वाघ अधिक

एखादा रुबाबदार वाघ पाळण्याची सूप्त इच्छा बहुतेक प्राणी प्रेमी बाळगून असतात. त्यातून मग अपवादात्मक परिस्थितीत वाघ पाळण्याच्या गोष्टींवरील चित्रपट, पुस्तके ही खपाऊ ठरली आहेत. मात्र प्रत्यक्षात वाघ, बिबटय़ा हे पाळीव प्राणी म्हणून बाळगणे हे पालकांसाठी मनाचे मांडे ठरले आहेत. भारतात वन्यजीव पाळण्यासाठी परवानगी नाही. वन्यजीवांच्या संवर्धनात आजपर्यंत सर्वाधिक भाव वाघाने खाल्ला आहे. निसर्गप्रेमी, अभ्यासक हे वाघांच्या संख्येकडे आणि स्थितीकडे डोळे लावून बसलेले असतात. वन्यजीव संवर्धनाभोवतीच्या अर्थकारणाचे केंद्रही वाघ आहे. थोडक्यात, भारतात राजा म्हणून वाघ राहतो आणि वाढतो. मात्र आपल्याकडे जसे परदेशी प्राणी किंवा पक्षी हौशीपोटी कैद केले जातात, तसाच हा वाघोबा परदेशांत अनेक हौशी प्राणी पालकांच्या कैदेत आहे. अनेक देशांमध्ये वाघ पाळायलाही परवानगी दिली जाते. संकेतस्थळांवरून कुत्र्याच्या पिल्लांच्या विक्री करण्याच्या जाहिराती आपल्याकडे झळकतात, तशाच परेदशात वाघाच्या बछडय़ांच्या जाहिराती झळकतात. हजारो डॉलर्स देऊन या पाळीव वाघाची खरेदी विक्री उघडपणे होते. अर्थात हे वाघ काही जंगलातून पकडून पिंजऱ्यात कोंडलेले नाहीत. त्यांच्या अनेक पिढय़ा या पिंजऱ्यातच जन्माला आल्या आणि प्राणी पालकांच्या घरात विसावल्या. जगातील वन्यजीवांचा अभ्यास करणाऱ्या एका संस्थेने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासानुसार जगात जवळपास १० हजार वाघ हे पाळीव, पिंजऱ्यात कोंडलेले आहेत. त्यामध्ये भारतीय वाघ (बेंगॉल टायगर) हा देखील आहे. भारतात जंगलात असलेल्या एकूण वाघांपेक्षा ही संख्या जास्त आहे.

भारतातील काळाबाजार

आपला वाघ परदेशी पाळीव ठरतो आणि आपल्याकडे परदेशी प्राण्यांची खरेदी विक्री तेजीत आहे. प्राण्यांच्या या खरेदी विक्रीच्या काळाबाजारात देशातील आघाडीच्या काही देशांमध्ये भारताचा क्रमांक लागतो. शेकडो कोटी रुपयांचा हा काळा बाजार देशांत विस्तारला आहे. कायद्यानुसार प्राण्यांची आयात किंवा निर्यात करण्यासाठी बंदी आहे. मात्र तरीही छुप्या मार्गाने हे प्राणी देशात आणले जातात. या बाजारपेठेची क्षमता इतकी आहे, की वेगळ्याच वातावरणातील प्रजाती आणून त्या जगवण्यासाठीचे सर्वतोपरी उपाय केले जातात. इतकेच नाही तर त्यांचे प्रजोत्पादनही होत असल्याचे अहवाल अनेक संस्थांनी प्रसिद्ध केले आहेत. प्राण्यांसाठी काम करणाऱ्या अनेक संस्थांनी या सगळ्या व्यवहारावर आवाजही उठवला आहे, न्यायालयातही धाव घेतली आहे. मात्र या सगळ्या पलीकडे जाऊन जंगलातला रुबाबदार वाघ पिंजऱ्यात कोंडून ठेवण्याची कल्पना प्राणी पालकांनी केली, तरी हौसेपोटी आपल्याकडे पिंजऱ्यात कैदी झालेल्या परदेशी प्राण्यांची किंमत कळू शकेल.

रसिका मुळय़े