करोना व्हायरसच्या वाढता प्रदुर्भावामुळे देशात सध्या लॉकडाउनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांप्रमाणे इतर नागरिकही आर्थिक आणि इतर अडचणींचा सामना करत आहेत. सरकारही नागरिकांना परिपुर्ण मदत करण्याचा प्रयत्न करत आहे.

आणखी वाचा : या सोप्या पद्धतीनं तपासा PF बॅलन्स

करोना व्हायरस या महामारीचा सामना करण्यासाठी कामगार आणि रोजगार मंत्रालयाने पीएफमध्ये बदल जारी केले आहेत. करोनाशी लढण्यासाठी भविष्य निर्वाह निधी (EPF) योजनेचे सदस्य असलेल्या सर्व कामगारांना अनिवार्य परताव्याशिवाय भविष्य निर्वाह निधीतून रक्कम काढता येणार आहे. रविवारी रात्री झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला असून अधिसूचना जारी केली आहे.

आणखी वाचा : घरबसल्या काढा PF मधील रक्कम, तीन दिवसांत जमा होईल खात्यावर

या नव्या सुधारणेनुसार तीन महिन्यांचे मूळ वेतन आणि महागाई भत्ता यांची एकत्रित रक्कम किंवा कामगाराच्या खात्यात एकूण जमा निधीच्या 75% पर्यंत यापैकी जी रक्कम कमी असेल ती त्या कामगाराला मिळू शकेल आणि ही रक्कम परत करणे अनिवार्य नसेल. कामगार मंत्रालयाने ही अधिसूचना जारी केल्यानंतर, यासंदर्भात सदस्यांकडून आलेल्या अर्जांवर तातडीने योग्य कारवाई करण्याचे आदेश कामगार भविष्य निर्वाह निधी संघटनेने सर्व प्रादेशिक कार्यालयांना दिले आहेत.