जगातील आघाडीचं सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या फेसबुकच्या तब्बल 500 मिलियन (50 कोटी) युजर्सचा डेटा लीक झाल्याचं वृत्त आहे. लीक झालेला डेटा ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विक्रीसाठीही उपलब्ध झाल्याचं समजतंय. फेसबुक युजर्सचे फोन नंबर्स बॉटद्वारे टेलिग्रामवर विकले जात आहेत.

Motherboard च्या रिपोर्टनुसार, लीक झालेला फेसबुक यूजर्सचा डेटा Telegram bot वर विकला जात आहे. चिंतेची बाब म्हणजे यात 61 लाखांपेक्षा जास्त भारतीय युजर्सचा डेटाही आहे. सिक्युरिटी रिसर्चर Alon Gal यांनी ट्विटरद्वारे याबाबत माहिती दिली. “खूप मोठ्या प्रमाणात युजर्सचा डेटाबेस सायबर क्राईम कम्युनिटीमध्ये विकला जात आहे, त्यामुळे लोकांची प्रायव्हसी धोक्यात येऊ शकते. फसवणुकीसाठी सायबर गुन्हेगार या डेटाचा वापर करु शकतात, यामुळे लोकांच्या सुरक्षिततेवर गंभीर परिणाम होतील”, असा इशारा Alon Gal यांनी दिलाय.


1,400 रुपयांमध्ये मोबाइल नंबरची विक्री
Motherboard च्या रिपोर्टनुसार, लीक डेटापैकी फेसबुक अकाउंटशी लिंक असलेल्या मोबाइल नंबरची विक्री जवळपास 1,400 रुपयांना (20 डॉलर)होत आहे. अन्य डेटाचाही दर अशाप्रकारे ठरवण्यात आला आहे. जवळपास 100 देशांतील युजर्सचा डेटा लीक झाला असून भारतातील 61 लाखांपेक्षा जास्त युजर्सच्या डेटाचा यामध्ये समावेश आहे.

बॉट म्हणजे काय?
बॉट एकप्रकारचं सॉफ्टवेअर असतं.आधापासूनच सेट केलेली कामं वारंवार करण्यासाठी बॉटचा वापर होतो. बॉटचा सर्वाधिक वापर सोशल मीडियामध्ये एखादी गोष्ट व्हायरल करण्यासाठी, री-ट्विट करण्यासाठी वगैरे होतो. एकच काम वारंवार करण्यासाठी बॉटला सर्वाधिक पसंती दिली जाते.