‘पिआजिओ इंडिया’ने भारतात ‘वेस्पा’ मालिकेतील नवीन स्कूटर लाँच केली आहे. Vespa Urban Club 125 असं या स्कूटरला नाव देण्यात आलं आहे. किंमतीच्या बाबतीत विचार केल्यास ‘पिआजिओ इंडिया’ची भारतीय बाजारातील ही आतापर्यंतची सर्वात स्वस्त स्कूटर आहे.

ही नवीन स्कूटर चार रंगामध्ये उपलब्ध असून यात ग्लॉसी येलो, ग्लॉसी रेड, एझुरो प्रोव्हेंझा आणि मेझ ग्रे या चार रंगांचे पर्याय आहेत. या चारही रंगांसोबत स्कूटरच्या मिरर, ग्रॅब रेल, ब्रेक लिव्हर्स आणि व्हिल येथे ग्लॉस ब्लॅक फिनिशिंग देण्यात आली आहे. वेस्पा मालिकेतील SXL, VXL या इतर स्कूटर्सप्रमाणेच स्कूटर्स नव्या स्कूटरमध्येही 125cc क्षमतेचं सिंगल-सिलिंडर, एअर-कुल्ड इंजिन देण्यात आलं आहे. हे इंजिन 7250 rpm वर 9.5 bhp ची ऊर्जा आणि 6250 rpm वर 9.9 Nm पीक टॉर्क निर्माण करते. 3-व्हॉल्टची ही मोटार अॅल्युमीनियम सिलिंडर हेड, ओव्हरहेड कॅम, रोलर रॉकर आर्म आणि व्हेरिएबल स्पार्क टायमिंग मॅनेजमेंटसह येते.

फीचर्सबाबत सांगायचं झाल्यास या नव्या स्कूटरमध्ये 10-इंचाचे ब्लॅक अॅलॉय व्हिल्स आणि दोन्ही बाजूंना ड्रम ब्रेक देण्यात आलेत. या स्कूटरमध्ये कम्बाइंड ब्रेकिंग सिस्टिम (CBS) हे फीचर देखील आहे. याशिवाय मोबाइल कनेक्टिव्हिटी फीचर देण्यात आलं असून एका क्लिकद्वारे स्कूटरमधील सर्व फीचर्सचा वापर करता येईल. या नव्या स्कूटरची दिल्लीमध्ये 73 हजार 733 रुपये इतकी एक्स शोरुम किंमत ठेवण्यात आली आहे. यापूर्वी Vespa ZX ही स्कूटर ‘पिआजिओ इंडिया’ची भारतीय बाजारातील सर्वात स्वस्त स्कूटर म्हणून ओळखली जात होती. 81 हजार 829 रुपये इतकी या स्कूटरची एक्स-शोरूम किंमत आहे.