मे महिना आला असून आता शाळांबरोबरच महाविद्यालयीन परीक्षाही संपत आल्या असतील. वर्षभर अभ्यास, काम आणि इतर गोष्टींतून मोकळा श्वास घेता यावा यासाठी लहान-मोठ्या सहलींचे आयोन केले जाते. त्यामुळे या सुटीत तुम्ही आपले कुटुंबिय किंवा मित्र-मैत्रीणींबरोबर फिरायला जाण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी काही चांगली ठिकाणे माहित असणे आवश्यक आहे. यामध्ये अगदी दोन दिवसांच्या ट्रीपपासून ते १५ ते २० दिवसांच्या ट्रीपपर्यंतचे अनेक पर्याय आपल्यासाठी उपलब्ध असतात. हल्ली ट्रॅव्हल कंपन्यांबरोबरच पर्सनली आपली ट्रीप मॅनेज करुन देणारे एजंटही सहज उपलब्ध आहेत. याशिवाय हल्ली ऑनलाइनही सगळी माहिती सहज उपलब्ध होते. त्यामुळे कोणाचीही मदत न घेता तुम्ही तुम्हाला हव्या त्या गोष्टींचे नियोजन करु शकता. यामध्ये राहण्याची ठिकाणे, प्रवासाचे माध्यम, फिरण्याची ठिकाणे यांचा प्रामुख्याने समावेश होतो. आपल्या बजेटप्रमाणे आणि आवडीनिवडींप्रमाणे आपण या गोष्टी सहज ठरवू शकतो. पाहूयात कोणत्या ठिकाणी जाता येऊ शकेल.

१. दक्षिण भारत – फिरायला जाण्यासाठी सध्याच्या हवामानात दक्षिण भारत हा उत्तम पर्याय ठरु शकतो. यामध्ये कुर्ग, बँगलोर-उटी-म्हैसूर, कन्याकुमारी, केरळ, अंदमान याठिकाणी जाऊ शकता. सध्या याठिकाणी तुलनेने कमी उकाडा असल्याने तुमचे त्याठिकाणी फिरणे आनंददायी होऊ शकते.

२. हिमाचल प्रदेश आणि काश्मिर – हिमाचल प्रदेश आणि काश्मिर हा बर्फाच्छादीत प्रदेश म्हणून ओळखला जातो. याठिकाणी असणाऱ्या पर्वतरांगा म्हणजे तर ट्रेकींग करणाऱ्यांसाठी पर्वणीच. त्यामुळे तुम्हाला व्यायामाची सवय असेल आणि नियमित ट्रेकिंग करण्याचा सराव असेल तर तुम्ही याठिकाणी नक्की जाऊ शकता. तसेच पाण्यातील साहसी खेळांसाठीही याठिकाणी अनेक पर्याय आहेत. तसेच आता याठिकाणी मोकळे हवामान असल्याने नीट फिरताही येते. कधीतरी याठिकाणी पडणारा बर्फ आपल्या ट्रीपमध्ये नक्कीच भर घालणारा ठरतो.

३. कोकण – इतक्या दूर ट्रीपला जाण्यासाठी सुटी नसेल आणि बजेटही नसेल तर महाराष्ट्रातील कोकण किनारपट्टी हा फिरायला जाण्यासाठी उत्तम पर्याय ठरु शकतो. अलिबाग, दापोली, गुहागर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, तारकर्ली असे अनेक समुद्रकिनारे आहेत. याठिकाणी समुद्रकिनाऱ्याबरोबरच वॉटरस्पोर्टस आणि इतरही काही पर्यटनस्थळे आहेत. नारळ आणि आंब्याच्या बागांमध्ये राहण्याची मौज काही औरच. रत्नागिरी– गणपतीपुळेसारखी सुंदर शहरे, मालवणच्या किनाऱ्यावर उभा असणारा सिंधुदुर्ग किल्ला, वाळूचे सागरी किनारे हे उत्तम पर्याय आहेत.

४. थंड हवेची ठिकाणे – थंड हवेच्या ठिकाणांमध्ये महाबळेश्वर, वाई, पाचगणी, माथेरान यांचा समावेश होतो. भर उन्हाळ्यात थोडासा थंडावा मिळवायचा असेल तर सहलीला जाण्यासाठी तुम्ही या ठिकाणांचा नक्कीच विचार करु शकता. याठिकाणी असणारे सर्व सोयीसुविधांनी युक्त हॉटेल्स, खरेदी करण्यासाठी असणारी बाजारपेठ आणि काही पॉईंटस हे तुम्हाला नक्कीच रिफ्रेश करतील.

. धरणांजवळील रिसॉर्ट – पुणे आणि इतरही ठिकाणी असणाऱ्या धरणांजवळ असणारे रिसॉर्ट हाही उन्हाळ्यात फिरायला जाण्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. बॅकवॉटर आणि त्याच्या जवळ रिसॉर्ट असल्याने याठिकाणी उन्हाळ्यातही हवेत गारवा असतो. तसेच या रिसॉर्टमध्ये तुम्ही कुटुंबासोबत किंवा मित्रमंडळींसोबत रिलॅक्स होऊ शकता.