प्लास्टिकमध्ये असलेल्या एका रसायनामुळे स्तनात कर्करोग होण्याची शक्यता असते, असे नवीन अभ्यासात म्हटले आहे. बिसफेनॉल एस (बीपीएस) असे या रसायनाचे नाव असून ते प्लास्टिक उद्योगात मोठय़ा प्रमाणावर वापरले जाते, या रसायनामुळे एण्डोक्राइनचे कार्य विस्कळीत होऊन कर्करोगास ते कारण ठरते. अमेरिकेतील ओकलॅण्ड विद्यापीठातील संशोधकांनी बीपीएसचा एस्ट्रोजेन रिसेप्टर अल्फा व ब्रॅका १ जनुकावर होणारा परिणाम तपासला आहे. स्तनाचे अनेक कर्करोग एस्ट्रोजेन रिसेप्टर पॉझिटिव्ह असतात. त्यात ५५ ते ६५ टक्के महिलांमध्ये ब्रॅका जनुक-१ च्या उत्परिवर्तनात दोष दिसून आला आहे. एस्ट्रोजने रिसेप्टर पॉझिटिव्ह ब्रेस्ट कॅन्सर असलेल्या महिलांच्या पेशी घेऊन त्यावर बीपीएसचे प्रयोग करण्यात आले असता त्याचा परिणाम हानीकारक

असल्याचे दिसून आले. स्तनाच्या कर्करोगाच्या पेशींवर एस्ट्रॅडिऑलचा प्रयोग केला असता बीपीएस एस्ट्रोजेनसारखे काम करून कर्करोगाच्या पेशी वाढवीत असल्याचे दिसून आले, असे ओकलॅण्ड विद्यापीठातील सुमी दिंडा यांनी म्हटले आहे. बीपीएसमुळे एस्ट्रोजेन रिसेप्टर प्रथिनाचे आविष्करण व ब्रॅका-१ जनुक  यावर परिणाम होतो असे त्यांचे म्हणणे आहे. सहा दिवस स्तनाच्या कर्करोग पेशी बीपीएसमध्ये ठेवल्यास त्यांच्या प्रमाणात १२ टक्के वाढ होते. आठ मायक्रोमोलर म्हणजे ६० टक्के इतकी वाढ वेगळ्या पातळीवर होते.