अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या समर्थकांनी कॅपिटॉल बिल्डिंगवर केलेल्या हल्ल्यानंतर माइक्रो ब्लॉगिंग वेबसाइट ट्विटरने ट्रम्प यांच्यावर कारवाई करताना त्यांचं ट्विटर अकाउंट कायमस्वरुपी बंद केलं. ट्विटरने ट्रम्प यांच्यावर केलेली ही कारवाई पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मात्र पथ्यावर पडली आहे.
ट्विटरने ट्रम्प यांचं अकाउंट कायमस्वरुपी बंद केल्यामुळे नरेंद्र मोदी हे आता जगात सर्वाधिक फॉलोअर्स असणारे सक्रीय राजकारणी बनले आहेत. ट्विटरवर मोदींचे 64.7 मिलियन म्हणजेच 6.47 कोटी फोलोअर्स आहेत. तर, अकाउंट बंद होण्यापूर्वी ट्रम्प यांच्या अकाउंटला 88.7 मिलियन म्हणजे 8.87 कोटी युजर्स फॉलो करायचे.
आणखी वाचा- ट्रम्प यांचे Twitter Account कायमचे बंद करण्याच्या निर्णयामागे आहे ‘ही’ भारतीय महिला
बराक ओबामा नंबर एक :
तर, अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांचे ट्विटरवर 127.9 मिलियन म्हणजे 12 कोटी 79 लाख फॉलोअर्ससह ट्विटरवर जगातील सर्वाधिक फॉलोअर्स असलेले नेता आहेत. मात्र ते सध्या कोणत्याही पदावर नाहीत, त्यामुळे त्यांचा सक्रीय नेत्यांच्या यादीत समावेश होत नाही. तर, अमेरिकेचे भावी अध्यक्ष जो बायडन यांचे 23.3 दशलक्ष म्हणजे २.३३ कोटी फॉलोअर्स आहेत. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे सध्या 24.2 दशलक्ष फॉलोअर्स आहेत. तर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या ट्विटरवरील फॉलोअर्सची संख्या 21.2 दशलक्ष आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on January 11, 2021 12:06 pm