फेब्रुवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यातच लाँच झालेल्या पोकोच्या Poco M3 या लेटेस्ट बजेट स्मार्टफोनला भारतीय ग्राहकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळताना दिसतोय. कारण लाँच झाल्यापासून आतापर्यंत अवघ्या १० दिवसांमध्ये तब्बल २. ५ लाखांपेक्षा Poco M3 फोनची विक्री झाली असल्याचा दावा कंपनीने केला आहे. शिवाय ३० लाखांपेक्षा जास्त जणांनी या फोनसाठी आपली पसंती दर्शवली असल्याचं कंपनीने म्हटलंय. Poco M3 फोनच्या भारतातील पहिल्याच सेलमध्ये तब्बल दीड लाखांपेक्षा जास्त Poco M3 फोनची विक्री झाली होती. २३ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता हा फोन फ्लिपकार्टच्या वेबसाइटवर पुन्हा सेलमध्ये उपलब्ध असेल.

पोको M3 फिचर्स आणि स्पेसिफिकेशन्स :-
या फोनमध्ये 6.53 इंचाचा फुल एचडी+ डिस्प्ले असून डिस्प्लेला कॉर्निंग गोरिल्ला ग्लास प्रोटेक्शनही आहे. 6जीबी रॅम आणि 128जीबीपर्यंत इंटरनल स्टोरेज असलेल्या या फोनमध्ये स्नॅपड्रॅगन 662 प्रोसेसर आहे.  फोटोग्राफीसाठी फोनमध्ये ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप आहे. यातील 48 मेगापिक्सेलच्या प्रायमरी सेन्सरसोबत एक 2 मेगापिक्सेलचा मॅक्रो लेन्स आणि एक 2 मेगापिक्सेलचा डेप्थ सेन्सर आहे. याशिवाय सेल्फीसाठी या फोनमध्ये 8 मेगापिक्सेलचा कॅमेराही मिळेल.  512जीबीपर्यंत माइक्रो एसडी कार्डचा सपोर्ट असलेल्या या फोनमध्ये कंपनीने 18W फास्ट चार्जिंगचा सपोर्ट असलेली 6000mAh क्षमतेची दमदार बॅटरी दिली आहे. कनेक्टिव्हिटीसाठी फोनमध्ये IR ब्लास्टर, 4G VoLTE , वाय-फायशिवाय अन्य सर्व स्टँडर्ड पर्याय आहेत.

आणखी वाचा- स्वस्त झाला Xiaomi चा पाच कॅमेऱ्यांचा ‘बजेट’ स्मार्टफोन, किंमत 10 हजारांपेक्षा कमी

पोको M3 किंमत :- 6जीबी रॅम+64जीबी इंटरनल स्टोरेज असलेल्या व्हेरिअंटची किंमत 10 हजार 999 रुपये आहे. तर, 6जीबी+128जीबी इंटरनल स्टोरेज व्हेरिअंटची किंमत 11 हजार 999 रुपये आहे.