अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला Poco F2 Pro हा स्मार्टफोन अखेर लॉन्च झाला आहे. Poco F2 Pro हा स्मार्टफोन म्हणजे कंपनीने दोन वर्षांपूर्वी आणलेल्या पोको F1 या स्मार्टफोनची पुढील आवृत्ती आहे. हा फोन चीनमध्ये यापूर्वी लॉन्च झालेल्या रेडमी K30 प्रोचा रिब्रँडेड व्हर्जन आहे. काल(दि.१२) एका ऑनलाइन इव्हेंटमध्ये हा फोन कंपनीने लॉन्च केला.

यापूर्वीही काही रिपोर्ट्समध्ये, कंपनी K30 प्रो हा स्मार्टफोन ‘Poco F2 Pro’ म्हणून लॉन्च करेल असा दावा करण्यात आला होता. अँड्रॉइड 10 वर आधारित या Poco F2 Pro मध्ये HDR10+ सपोर्टसह 6.67 इंच फुल एचडी+ डिस्प्ले असेल. पॉप-अप सेल्फी कॅमेरा डिझाइनसह या फोनमध्ये 8जीबीपर्यंत रॅम आणि 256 जीबीपर्यंत इंटर्नल स्टोरेज मिळेल. मागील बाजूला चार कॅमेऱ्यांचा सेटअप आहे. यातील 64 MP क्षमतेचा मुख्य कॅमेरा आहे. तर, 13MP + 8MP + 5MP क्षमतेचे अन्य तीन कॅमेरे आहेत. याशिवाय पुढील बाजूला 20 मेगापिक्सल क्षमतेचा पॉप-अप सेल्फी कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन निऑन ब्लू, सायबर ग्रे, इलेक्ट्रिक पर्पल आणि फँटम व्हाइट अशा चार रंगांच्या पर्यायांमध्ये उपलब्ध असेल. 5G सपोर्टसह या फोनमध्ये असेल तसेच स्नॅपड्रॅगन 865 प्रोसेसरसोबत UFS 3.1 स्टोरेज आहे. बराच वेळ वापरल्यानंतर किंवा गेम खेळताना फोन गरम होऊ नये यासाठी खास ‘व्हेपर चेम्बर लिक्विड कूलिंग टेक्नॉलॉजी’चा वापर करण्यात आला आहे. फोनमध्ये 4,700mAh क्षमतेची फास्ट चार्जिंग सपोर्ट असलेली दमदार बॅटरी असून केवळ ६३ मिनिटांमध्ये फोन पूर्ण चार्ज होतो असा दावा कंपनीने केला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी या फोनमध्ये 5G, Wi-Fi 6, ब्लूटूथ , NFC, USB Type-C हे फीचर्स आहेत.

किंमत :- हा फोन भारतात विक्रीसाठी कधीपर्यंत उपलब्ध असेल याबाबत कंपनीने माहिती दिलेली नाही. पण, पोको F1ला भारतात शानदार प्रतिसाद मिळाल्यामुळे Poco F2 Pro हा नवीन फोन कंपनी लवकरच भारतातही उपलब्ध करण्याची दाट शक्यता आहे. हा फोन दोन व्हेरिअंटमध्ये कंपनीने लॉन्च केला आहे. 6GB + 128GB व्हेरिअंटची किंमत EUR 499 म्हणजे जवळपास 41,500 रुपये. तर, 8GB RAM + 256GB स्टोरेज व्हेरिअंटची किंमत EUR 599 म्हणजे जवळपास 50 हजार रुपये आहे.