जागतिक पातळीवर पोलिओचे निर्मूलन करण्यासाठी आता नॅनो पार्टिकलवर आधारित लस विकसित करण्यात आली आहे. एकाच इंजेक्शनमध्ये पोलिओला प्रतिबंध करणे शक्य होणार आहे.

मॅसॅच्युसेट इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी या संस्थेने ही लस विकसित केली असून एकाच इंजेक्शनमध्ये एकाचवेळी अनेक डोस दिले जातील, त्यामुळे पाकिस्तानसारख्या देशात दूरस्थ भागात पोलिओ निर्मूलनास मदत होईल. पण पाकिस्तानमध्ये पोलिओ लसीच्या माध्यमातून नसबंदी केली जात असल्याचा समज असल्याने तेथे अनेक पोलिओ लस कार्यक्रमातील आरोग्यसेवकांची हत्या करण्यात आली आहे. १९८८ते २०१३ दरम्यान जगात पोलिओच्या रूग्णांचे प्रमाण ९९ टक्क्य़ांनी कमी झाले असल्याचे यूस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल या संस्थेने म्हटले आहे.

पोलिओचे अजून पूर्णपणे निर्मूलन झालेले नाही. दूरस्थ भागातील मुलांपर्यंत पोहोचता येत नसल्याने यात अडचणी येत आहेत. अनेक वेळा लस देणे आवश्यक असतानाही त्यात फारसे यश मिळत नाही पण आता एकाच इंजेक्शनमध्ये अनेक डोसेस (मात्रा) दिले जाणार असल्याने पुन्हा पुन्हा लसीकरण करावे लागणार नाही. अमेरिकेतील एमआयटीच्या संशोधक अ‍ॅना जॅकलेनेक यांनी सांगितले, की एकाच इंजेक्शनमध्ये काम भागणार असल्याने नॅनो पार्टिकल्सच्या मदतीने दिली जाणारी ही लस महत्त्वाची आहे. १९५० मध्ये पोलिओवर पहिली लस साल्क यांनी तयार केली होती. सुरूवातीला पोलिओ लशीची दोन ते चार इंजेक्शन घ्यावी लागत. दोन महिन्याच्या वयापासून ही लस सुरू केली जाते. १९६१ मध्ये तोंडावाटे देण्याची लस तयार करण्यात आली.  पण त्यात दोन ते चार डोसनंतरच चांगले संरक्षण मिळते. साल्क लसीपेक्षा तोंडावाटे देण्याची लस सोपी असल्याने विकसनशील देशात तिचाच वापर केला जातो.

नवीन लस एकदा टोचल्यानंतर पहिला डोस त्याचवेळी प्रसारित होतो व दुसरा डोस ती लस शरीरात साठवून २१ दिवसांनी प्रसारित केला जातो.