17 July 2019

News Flash

प्रशीतनाशिवाय राहणारी पोलिओ लस तयार

पोलिओची लस आता काही आठवडे प्रशीतनाशिवाय राहू शकते.

( संग्रहीत प्रतिकात्मक छायाचित्र )

पोलिओची लस आता काही आठवडे प्रशीतनाशिवाय राहू शकते. अशा प्रकारची गोठवलेली कोरडी लस तयार करण्यात वैज्ञानिकांना यश आले असून त्यामुळे दूरस्थ भागात लस वाहून नेण्याचे काम सोपे झाले आहे. ही इंजेक्शनमधून देता येणारी लस कक्ष तपमानाला चार आठवडे ठेवून निर्जलीकरण केले जाते. त्यातून पोलिओ विषाणूपासून संरक्षण होण्याची क्षमता तरीही कायम राहते. अमेरिकेतील युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ कॅलिफोर्नियाचे वू जिन शिन यांनी सांगितले, की लशीचे स्थिरीकरण हे फार मोठे अवघड विज्ञान नाही; पण एखादी लस जर स्थिर राहत नसेल तर तिची वाहतूक करणे अवघड होते. पोलिओ आजार जवळपास नष्ट झाला असून जगात २०१७ मध्ये त्याचे २२ रुग्ण होते. हा संसर्गजन्य रोग असून त्यामुळे पक्षाघात होतो, हातपाय लुळे पडतात.

तापमानानुरूप स्थिर राहू शकणारी लस तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असून उंदरांवरील प्रयोगात त्यात यश आले आहे. नायजेरिया, पापुआ न्यूगिनी, सीरिया, पाकिस्तान या देशांत पोलिओचे रुग्ण आहेत. कोरडय़ा अवस्थेत लस गोठवण्यासाठी त्यातील बाष्प काढून घेतले जाते. याआधी गोवर, विषमज्वर यावर अशा लशी तयार करण्यात आल्या आहेत, पण पोलिओची लस या स्वरूपात म्हणजे फ्रीज ड्रायिंग पद्धतीने तयार करता आली नव्हती. यात लिक्विड क्रोमॅटोग्राफी व हाय थ्रुपुट स्क्रीनिंग ही दोन तंत्रे वापरण्यात आली आहेत. या लशीतील घटकांवर कोरडय़ा स्वरूपात बदल होत नाही व ते तितकेच प्रभावी राहतात.

First Published on December 5, 2018 12:58 am

Web Title: polio vaccine refrigeration