भारतात  सूक्ष्म कणांनी होणाऱ्या प्रदूषणामुळे लोकांच्या आयुर्मानावर एचआयव्ही एड्स, धूम्रपान, दहशतवाद यापेक्षाही जास्त परिणाम होत आहे, असे एका अभ्यासात दिसून आले असून जर भारताने जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे पाळली तर भारतीयांचे आयुर्मान ४.३ वर्षे वाढू शकते असे स्पष्ट करण्यात आले.

हवा दर्जा जीवन निर्देशांक अमेरिकेच्या शिकागो विद्यापीठातील संशोधकांनी विकसित केला असून जगात सूक्ष्म कणांच्या प्रदूषणामुळे व्यक्तींचे आयुर्मान १.८ वर्षांनी कमी झाले आहे. या निर्देशांकानुसार भारत व चीन मध्ये जगातील ३६ टक्के लोकसंख्या असून तेथील आयुर्मान प्रदूषणामुळे कमी झाले आहे. भारतात जर जागतिक आरोग्य संघटनेची मार्गदर्शक तत्त्वे पाळली गेली तर आयुर्मान सरासरी ४.३ वर्षांनी वाढू शकते. जगातील लोकांच्या आरोग्याला सूक्ष्म कणांमुळे  होणाऱ्या प्रदूषणाचा जो धोका आहे तो घटक यात गृहीत धरला असून क्षय, एचआयव्ही एडस, धूम्रपान व युद्ध यापेक्षाही या प्रदूषणाचे परिणाम घातक आहेत. जगातील लोक जी हवा श्वासाद्वारे घेत आहेत त्यामुळे आरोग्याची मोठय़ा प्रमाणावर हानी होत असून त्याचा मुकाबला करण्याची गरज आहे, असे एनर्जी  पॉलिसी इन्स्टिटय़ूट या शिकागो विद्यापीठाच्या संस्थेचे प्राध्यापक मायकेल ग्रीनहाऊस यांनी म्हटले आहे. जगातील ५.५ अब्ज लोक हे तीव्र हवा प्रदूषण असलेल्या भागात राहतात. अमेरिकेत एक तृतीयांश लोक जागतिक आरोग्य संघनेची मार्गदर्शक तत्त्वे पाळत नाहीत. त्यामुळे ही तत्त्वे पाळली तर त्यांचेही आयुर्मान सरासरी १-२ वर्षे वाढू शकते.

सूक्ष्म कणांमुळे होणारे प्रदूषण  हे माणसाचे आयुष्य सरासरी १.८ वर्षांनी कमी करते, त्यामुळे मानवी आरोग्यापुढील ते मोठे आव्हान आहे. धूम्रपानाने आयुर्मान १.६ वर्षांनी कमी होते.  अल्कोहोल व अमली पदार्थानी ११ महिने, अशुद्ध पाण्याने ७ महिने, एड्स व एचआयव्हीने ४ महिने, दहशतवाद व इतर संघर्षांनी आयुर्मान २२ दिवसांनी कमी होते.