पर्यावरणातील प्रदूषकांमुळे मूत्रपिंडांवर वाईट परिणाम होऊन त्यांची हानी होते असे एका संशोधनात दिसून आले आहे. पेरफ्लुरोअल्काइल व पॉलिफ्लुरोअल्काइल वर्गातील पदार्थ हे अविघटनशील असतात व ते औद्योगिक प्रक्रियेत वापरले जातात. त्यातून ते पर्यावरणात पसरतात, असे डय़ुक विद्यापीठाच्या संशोधकांनी म्हटले आहे. प्रदूषित अन्न, पाणी, माती व हवा यातून ही पीएफएएस संयुगे माणसाच्या शरीरात प्रवेश करतात. क्लिनिकल जर्नल ऑफ अमेरिकन सोसायटी ऑफ नेफ्रॉलॉजी या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या शोधनिबंधानुसार या संयुगांचा मूत्रपिंडांवर आणखी कोणता अनिष्ट परिणाम होतो हे तपासण्यासाठी पुढील संशोधनाची गरज आहे. पीएफएएस संयुगे ही मूत्रपिंडाच्या आरोग्वावर वाईट परिणाम करतात. यापूर्वीच्या संशोधनातूनही हे दिसून आले आहे. मूत्रपिंडे हा मानवी शरीरातील एक संवेदनशील अवयव असून पर्यावरणातील विष जेव्हा रक्तात येते तेव्हा त्यांचा फार वाईट परिणाम त्यांच्यावर होतो असे डय़ुक युनिव्हर्सिटीचे जॉन स्टॅनिफर यांनी म्हटले आहे. अनेक लोकांच्या शरीरात पीएफएएस रसायने जातात पण ते मूत्रपिंड विकारास कसे कारणीभूत ठरतात यावर अजून प्रकाश टाकणे गरजेते आहे. या विषयावर एकूण ७४ शोधनिबंध आतापर्यंत झाले असून त्यात पीएफएएसच्या भूमिकेविषयी वेगवेगळे निष्कर्ष काढले आहेत. मुलांपासून प्रौढांपर्यंत सर्वाच्याच शरीरात या प्रदूषकांचा प्रवेश होत असतो. आतापर्यंतच्या अनेक संशोधन अहवालांचा अभ्यास केला असता त्यातूनही त्यांचे घातक परिणाम स्पष्ट होत आहेत.