भारतात घरांमध्ये तसेच घराबाहेर पडल्यावर हवेच्या वाढत्या प्रदूषणाला सामोरे जावे लागत असून त्यामुळे हृदयविकाराचा झटका, पक्षाघात यांसारख्या हृदय आणि रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग होण्याची जोखीम वाढली आहे, असे एका अभ्यासात म्हटले आहे.  यासंदर्भात स्पेनमधील बर्सिलोना इन्स्टिटय़ूट फॉर ग्लोबल हेल्थ (आयएसग्लोबल) मधील शास्त्रज्ञांच्या नेतृत्वाखालील अभ्यासकांच्या चमूने संशोधन केले आहे.‘अथेरोस्क्लेरोसिस’ म्हणजेच शरीरातील रक्तवाहिन्यांची जाडी वाढल्यास ‘कॅरोटिड इंटिमा मीडिया थिकनेस’ (सीआयएमटी) हे त्याचे निदर्शक मानले जाते.

अल्प आणि मध्यम उत्पन् न गटातील देशांमध्ये हे मानक वापरले जाते. या देशांतील घरगुती आणि सार्वजनिक ठिकाणी होणाऱ्या वायुप्रदूषणाचा ‘सीआयएमटी’शी काय संबंध आहे, याबाबत ‘आयएसग्लोबल’मधील शास्त्रज्ञांनी केलेले संशोधन हे या प्रकारचे पहिलेच संशोधन आहे. हे संशोधन हैदराबाद शहराच्या सीमावर्ती परिसरात करण्यात आले. वायुप्रदूषण करणाऱ्या कणांचे सर्वाधिक प्रमाण असलेल्या भागात राहणाऱ्या लोकांचा ‘सीआयएमटी’ निर्देशांक हा तुलनेत अधिक असतो. याचाच अर्थ अशा लोकांना हृदयविकार, पक्षाघात यांसारखे रक्तवाहिन्यांशी संबंधित रोग होण्याची जोखीम जास्त असते.

याबाबतचा अभ्यास ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ इपिडेमिलॉजी’मध्ये प्रसिद्ध झाला आहे. या अभ्यासादरम्यान तीन हजार ३७२ लोकांची तपासणी करण्यात आली. एलयूआर (लॅण्ड युज रिग्रेशन) पद्धतीचा वापर करून या लोकांचा सीआयएमटी निर्देशांक आणि ते राहात असलेल्या भागातील वायुप्रदूषणाचे प्रमाण निश्चित करण्यात आले.
या लोकांच्या घरी स्वयंपाकासाठी कोणते इंधन वापरले जाते, याचीही माहिती घेण्यात आली. वर्षभराचा विचार करता प्रदूषणकारी कणांशी अधिक संपर्क येणाऱ्या लोकांचा सीआयएमटी निर्देशांक उच्च असल्याचे दिसून आले.