दिल्ली आणि परिसरात हवा प्रदूषण धोकादायक पातळीवर वाढल्याने शाळांना उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. सकाळच्या सत्रात विद्यार्थ्यांना वर्गातच ठेवणे, मैदानावर आणल्यास मास्क लावणे असे काही उपाय शाळांनी योजण्यास सुरुवात केली आहे.

दिवाळीनंतर प्रदूषण आणखी वाढेल असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. सर्व वर्गामध्ये शुद्ध हवा घेता यावी यासाठी उपकरणे लावल्याचे गुडगाव येथील हेरिटेड एक्सपियरेंटल लर्निग स्कूलच्या प्राचार्य दीपा कुमार यांनी सांगितले. या उपकरणांवर देखरेख ठेवण्यासाठी तज्ज्ञांचे पथक नेमल्याचे त्यांनी स्पष्ट केले. गेल्या तीन आठवडय़ांपासून दिल्लीच्या हवेची वाटचाल खराब ते अतिखराब अशी आहे. रविवारी यात सुधारणा झाली तरी ती खराबच आहे. शाळा प्रशानाला खराब हवेमुळे मैदानी खेळ रद्द करावे लागत असून, गरज भासल्यास खेळाच्या तासाला वर्गातच आम्ही कवायत करत असल्याचे दीपा कुमार यांनी स्पष्ट केले. मुलांना मास्क लावूनच शाळेत पाठवा, असा सल्ला आम्ही पालकांना दिल्याचे दिल्लीतील मयूर विहारमधील एलकॉन इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य अशोक पांडे यांनी स्पष्ट केले. काही शाळांनी तर हिरव्या भाज्या व फळे वाटणे सुरू केले आहे. आहारात त्याचा समावेश केल्यास हवा प्रदूषणाचा फुप्फुसावर होणारा परिणाम कमी करता येतो, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. त्यामुळे शाळांनी हे उपाय योजले आहेत. दिवाळीच्या तोंडावर फटाक्यांमुळे होणाऱ्या दुष्परिणामांबाबतही शाळा जनजागृती करत आहेत. विद्यार्थ्यांनी हरित दिवाळी साजरी करावी यासाठी प्रोत्साहन देत आहोत, असे स्प्रिंगडेलच्या प्राचार्य अमिता वट्टल यांनी सांगितले.