कॅलिफोर्निया विद्यापीठाचे संशोधन
मोबाइल फोन व विद्युत वाहने चालवण्यासाठी लागणारी बॅटरी तयार करण्यासाठी पोर्टाबेला प्रकारच्या अळिंबीचा (मशरूम) प्रभावी वापर करणे शक्य आहे, असे संशोधकांचे मत आहे.
कॅलिफोर्निया विद्यापीठाच्या रिव्हरसाईड बोर्नस कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग या संस्थेतील संशोधकांनी म्हटले आहे, की पोर्टाबेला अळिंबी अजिबात खर्चिक नाही, शिवाय पर्यावरणस्नेही आहे व त्याचे उत्पादनही सहज शक्य आहे. या अळिंबीचा वापर करून लिथियम आयन बॅटरीचा नवीन अ‍ॅनोड तयार करण्यात आला आहे. सध्याच्या परिस्थितीत लिथियम आयन बॅटरीत ग्राफाईटचा अ‍ॅनोड वापरला जातो त्याचा उत्पादन खर्च अधिक आहे, कारण त्यासाठी ग्राफाईट शुद्ध स्वरूपात मिळवावे लागते ती प्रक्रिया किचकट आहे, त्यामुळे पर्यावरणाची हानी होत असते. आता विद्युत वाहने व इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाइल यासाठी मोठय़ा प्रमाणात विजेऱ्यांचा वापर होत असतो, त्यासाठी ग्राफाईटच्या जागी दुसरा पर्यायी पदार्थ शोधण्याचे वैज्ञानिकांचे प्रयत्न चालू आहेत.
रिव्हरसाईड अभियंत्यांनी अळिंबीचा वापर जैवभार स्वरूपात अ‍ॅनोडसाठी केला आहे. ही अळिंबी सच्छिद्र असल्याने त्यातून द्रव किंवा हवा एका बाजूने दुसरीकडे जाऊ शकते. बॅटरीत सच्छिद्रता महत्त्वाची असते, त्यामुळे ऊर्जेच्या साठवणीसाठी जागा निर्माण होते. जितकी जागा जास्त तितकी बॅटरीची कार्यक्षमता जास्त असते. अळिंबीतील पोटॅशियम क्षाराच्या संहतीमुळे विद्युतअपघटनी पदार्थ सतत क्रियाशील राहतो व आणखी सच्छिद्र भाग तयार होतो, त्यामुळे बॅटरीची क्षमता वाढते. पारंपरिक अ‍ॅनोडमध्ये लिथियमला पहिल्यांदा विद्युतअपघटनी पदार्थ वापरण्यास मुभा मिळते, पण नंतर त्याची क्षमता कमी होऊन इलेक्ट्रोड खराब होतो. अळिंबीचा कार्बन अ‍ॅनोड तयार करण्याचे तंत्रज्ञान वापरून ग्राफाईट अ‍ॅनोडपेक्षा चांगले परिणाम साध्य करता येतात. या नवीन तंत्रज्ञानामुळे या पुढील काळात बॅटरीत सुधारणा होऊन मोबाइलची बॅटरी जास्त काळ चालवता येईल. या बॅटरीचे विद्युतभारण करताना कार्बनी रचनेची सच्छिद्रता वाढून जास्त ऊर्जा साठवली जाईल असे ब्रेनन कॅम्पबेल यांनी सांगितले. सायंटिफिक रिपोर्ट्स या नियतकालिकात हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.
पोर्टाबेला अळिंबीचा अ‍ॅनोडसाठी वापर
’  ग्राफाईटला नवा पर्याय
’ अळिंबीचा जैवभार रूपात वापर
’ सेलफोनची बॅटरी जास्त चालणार