कधी अचानक खिशात मोबाईल फुटल्याचे किंवा कधी चार्जिंगला लावलेला असताना त्याचा स्फोट झाल्याचे आपण अनेकदा ऐकतो. जे उपकरण आपल्या दिवसभर हातात असते ते असे अचानक फुटते तेव्हा एकतर आजुबाजूच्या वस्तूंचे नुकसान होते नाहीतर व्यक्तीला इजा होते. आता अशाप्रकारे एकाएकी फोन फुटण्यामागे नेमके काय कारण असेल हे आजपर्यंत सापडलेले नाही. मात्र मोबाईलची बॅटरी अचानक फुटण्यामागे कोणते एक कारण नाही. तर अनेक कारणांमुळे फोन अचानक पेट घेऊ शकतात. त्यामुळे फोन फुटू नये म्हणून बॅटरी चार्ज करताना किंवा एरवीही काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. पाहूयात काही सोप्या पण महत्त्वाच्या गोष्टी ज्यामुळे तुमचा फोन अशा अपघातापासून नक्की वाचू शकतो.

१. चार्जिंगला असताना फोन वापरणे  – अनेकांना सध्या मोबाईलचे अक्षरश: वेड लागलेले पहायला मिळते. जाऊ तिथे प्रत्येकाच्या हातात मोबाईल असतो. अनेकांना मोबाईल चार्जिंगला असेपर्यंतही दम निघत नाही. फोन चार्जिंगला असेल तरीही हे लोक मोबाईलवर बोलतात किंवा किमान वेगवेगळी अॅप्लिकेशन्स वापरतात. मात्र त्यामुळे मोबाईलचा स्फोट होण्याची शक्यता असते. चार्जिंगला असताना फोनसाठी तो आराम करण्याचा काळ असतो. याबरोबरच फोन स्विच ऑफ करुन तो चार्जिंगला लावल्यास जास्त वेगाने आणि योग्य पद्धतीने चार्ज होतो. त्यामुळे जास्त महत्त्वाचे काम नसल्यास या पर्यायाचा नक्की विचार करा.

२. रात्रभर फोन चार्जिंगला ठेवणे – अनेकांना दिवसभर फोन वापरुन रात्री तो चार्ज करण्याची सवय असते. असे करणे ठिक असले तरीही फोन चार्जिंगला लावून झोपून जाणे योग्य नाही. कारण यामध्ये फोन प्रमाणापेक्षा जास्त चार्ज होतो. त्यामुळे फोनची बॅटरी लवकर खराब होण्याची शक्यता असते. जास्त चार्जिंग करणे हे फोन फुटण्याचे एक महत्त्वाचे कारण असते हे लक्षात घ्या.

३. आपल्याच फोनचा ओरिजिनल चार्जर न वापरणे – काही वेळा आपला चार्जर हरवला म्हणून किंवा ऑफीसला असताना घरी विसरला म्हणून आपण दुसऱ्यांचे चार्जर वापरतो. सध्या सर्व फोनला एकच चार्जिंग केबल चालते. मात्र आपला फोन वेगळ्या कंपनीचा असेल आणि आपण वेगळ्या कंपनीचा चार्जर वापरत असू तर आपल्या फोनची बॅटरी खराब होते. त्यामुळे आपल्याच फोनचा ओरीजनल चार्जर वापरणे केव्हाही चांगले.

४. फोनवर थेट सूर्यप्रकाश पडणे – फोन अशा ठिकाणी ठेऊ नका ज्याठिकाणी फोनवर थेट सूर्यप्रकाश पडेल. जर फोनवर जास्त सूर्यप्रकाश पडला तर तो प्रमाणापेक्षा जास्त गरम होतो आणि त्याच्या आतली यंत्रणा बिघडण्याची शक्यता असते. यामुळे फोनचा समतोल बिघडतो आणि फोन फुटण्याचा धोका अधिक असतो.