साऊंड ऑफ म्युझिक
प्रार्थना गीतं हा मनाला एक वेगळीच अनुभूती देणारा गीतप्रकार. हिंदी आणि मराठीतल्या कितीतरी प्रार्थना गीतांनी श्रोत्यांच्या मनांना स्निग्ध शांतता दिली आहे.

नुकत्याच रंगलेल्या कलर्स मराठीच्या ‘सूर नवा ध्यास नवा’ कार्यक्रमाची सुरुवात ‘तू बुद्धी दे, तू तेज दे’ या गुरू ठाकूर यांनी लिहिलेल्या आणि राहुल रानडे यांनी स्वरबद्ध केलेल्या सुमधुर प्रार्थनागीताने झाली. या गीताचे आर्जवी शब्द आणि प्रसन्न स्वर काही क्षणातच  मनाला ऊर्जति करून गेले. त्यावेळी मनात एक विचार चमकून गेला की आपल्या मनाच्या अवकाशाची व्याप्ती क्षणात अमर्याद करणारा ‘प्रार्थनागीत’ हा संगीत प्रवाह, इतका प्रभावी असूनही थोडासा दुर्लक्षितच राहिला का? म्हणजे असं की, संगीतातील ख्याल, बंदिश, ठुमरी, भावगीत, भक्तीगीत, गझल, होरी, चती अशा अनेक प्रकारांतून  नाद्ब्रह्माचा सातत्याने विचार आणि नवनिर्मिती झाली. पण त्यामध्ये अर्थपूर्ण शब्दातून आणि सोप्या-सहज चालीतून मनाला क्षणात शांत करणाऱ्या प्रार्थनागीतांची निर्मिती खूपच कमी झाली. प्रार्थनागीतांचा  विचार मनात आल्यावर वेगवेगळ्या वयोगटांतील मंडळींना, ‘कोणती प्रार्थनागीतं आवडतात?’ असं विचारून बघितलं. या उत्तरांमध्ये काही ठरावीक श्लोक, स्तोत्र, शाळेतील प्रार्थना, पसायदान, मराठी िहदी गीते याबरोबरच एक उत्तर खूप मार्मिक होतं. ‘चॉइस जास्त नाही, त्यामुळे तीच तीच ऐकली आणि म्हटली जातात!’

मनाला सचेतन करणाऱ्या, प्रात:समयी किंवा तिन्हीसांजेला माजघरात म्हटल्या जाणाऱ्या प्रार्थनागीतांनी उंबरठा ओलांडून नव्या रूपात लोकप्रियता मिळवायला सुरुवात केली ती रुपेरी पडद्याच्या आगमनानंतर. असं लक्षात येईल की साधारण एका दशकाच्या कालावधीत अशा प्रकारचं मनाला सकारात्मक ऊर्जा, शांती, विश्वास आणि शांतता देणारं एक तरी गीत मोठय़ा प्रमाणात लोकप्रिय झालं. स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९५२ साली आलेल्या ‘आनंदमठ’ या चित्रपटात हेमंतकुमार यांनी स्वरबद्ध केलेलं आणि लता दीदींनी गायलेलं बंकिमचंद्र चटोपाध्याय यांचं ‘वंदे मातरम्’ म्हणजे प्रत्यक्ष भारतभू, स्वातंत्र्य देवातेचाच  जागर! लता दीदींच्या तळपत्या स्वरातील, १९६० च्या दशकात लोकप्रियतेचा कळस गाठलेलं हे गीत आजही ऐकताना रोमारोमात विलक्षण चेतना जागृत करतं.

या जोशपूर्ण गीताच्या पार्श्वभूमीवर १९५७ च्या दरम्यान आलेलं ‘दो आंखे बारह हाथ’ या चित्रपटातील लता दीदींच्या आवाजातील ‘ए मालिक तेरे बंदे हम’ हे भरत व्यासलिखित आणि वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं प्रार्थनागीत म्हणजे करुण रसाचा परिपोषच म्हणावा लागेल. ही प्रार्थनागीतं खऱ्या अर्थाने त्या त्या दशकातील इतिहास आणि लोकमानस यांची प्रतििबब असावीत असं वाटतं. १९५७ च्या दरम्यान युद्धकथेवरच्या  ‘हम दोनो’ या चित्रपटातील ‘अल्लाह तेरो नाम ईश्वर तेरो नाम’ या साहीर लुधियानवी यांनी शब्दबद्ध केलेल्या आणि जयदेव यांनी स्वरबद्ध केलेल्या, लता मंगेशकर यांच्या प्रार्थनागीताला अमाप लोकप्रियता मिळाली. दीदींच्या स्वराचा परिसस्पर्श लाभल्यामुळे ‘सबको सन्मती’ देण्यावाचून त्या नियंत्याकडे पण दुसरा कुठला पर्यायच राहिला नसणार, इतका तो आर्जवी आणि सात्त्विक भाव गौड सारंग रागातील या गीतातून पाझरत राहतो. ईश्वर आणि अल्लाह या शब्दात अडकून पडलेल्या मनामनातलं वैर काही क्षणात हे प्रार्थनागीत नाहीसं करतं. स्वरांच्या त्या दिव्यत्वाला सलाम!

१९७०च्या दशकातील मनावर  तरंग उठवणारं  आणि आजही शाळांमधून म्हटलं जाणारं लाडकं प्रार्थनागीत म्हणजे केदार रागातील प्रसन्न स्वरात नटलेलं ‘हम को मन की शक्ती देना’, हे गुलजार याचं वसंत देसाई यांनी स्वरबद्ध केलेलं गीत. शाळेत यायला उशीर झाल्यामुळे घाईघाईत आलेली अल्लड जया भादुरी.. एक डोळा उघडून तिचं ते चोरून टीचरकडे बघणं. टीचरने डोळे वटारून बघणं.. किती निरागस आणि जिवंत वाटतं. ही प्रार्थनागीतं लोकप्रिय करण्यात रुपेरी पडदा आणि  रेडिओ या माध्यमांचा महत्त्वाचा वाटा आहे.

१९८६ च्या दरम्यान कुलदीप सिंग या अत्यंत व्यासंगी संगीतकाराने स्वरबद्ध केलेलं कवी अभिलाष याचं अंकुश चित्रपटातील प्रार्थनागीत ‘इतनी शक्ती हमे देना दाता मन का विश्वास कम जोर हो ना’ हे आजही लोकप्रियतेच्या शिखरावर आहे. सध्याच्या सामाजिक व्यवस्थेमुळे हतबल झालेल्या मनाला काही क्षणात संजीवनी देणाऱ्या शब्द आणि स्वरांचं विलक्षण सामथ्र्य कुलदीप सिंग यांच्या संगीत साधनेने या गीताला दिलं असावं. १९९१ सालच्या प्रहार चित्रपटात ‘हमारी ही मुठ्ठी मे आकाश सारा’ या मंगेश कुलकर्णी यांच्या गीताला लक्ष्मीकांत प्यारेलाल यांनी संगीत दिलेलं प्रार्थनागीत खूप आशयपूर्ण आहे.

या दरम्यान मराठी चित्रसृष्टी आणि भावसंगीत प्रयोगात काही उत्तम प्रार्थनागीतांची निर्मिती झाली. ज्योतिबाचा नवस चित्रपटातील ‘सत्य शिवाहून सुंदर हे’ या बाबुजींनी गायलेल्या आणि स्वरबद्ध केलेल्या प्रार्थनागीताची लोकप्रियता आजही टिकून आहे. तिलककामोद रागातील शास्त्रीय बंदिशीवर आधारित ‘गगन सदन तेजोमय’ हे पं. हृदयनाथ मंगेशकर यांनी स्वरबद्ध केलेलं लता दीदींच्या स्वरातील प्रार्थनागीत मनाचा गाभारा तेजोमय करत राहतं.

पं. प्रभाकर जोग यांनी स्वरबद्ध केलेलं ‘आम्ही चालवू हा पुढे वारसा’ ही प्रार्थना गुरूप्रति असलेला विनम्र भाव आणि कार्याप्रति जबाबदारीची जाणीव किती सहज उभी करते. श्रीधर फडके यांनी संगीतबद्ध केलेली ‘जय शारदे वागेश्वरी’ ही प्रार्थना ऐकून, ती वागेश्वरी पण श्रीधर फडके पुढची प्रार्थना कधी स्वरबद्ध करणार याची आतुरतेने वाट बघत असणार, इतक्यावेळा आम्ही ती गायलो आहोत! श्रीधरजींच्या ‘मना घडावी संस्कार’, ‘ओमकार स्वरूपा’, ‘गुरु परमात्मा परेषु’ या रचनांमध्ये पण विलक्षण ऊर्जा जाणवते.

गेल्या दोन दशकांत तरुण संगीत दिग्दर्शकात कौशल इनामदार यांनी स्वरबद्ध केलेली प्रार्थना गीते लक्षात राहतात. त्यांचे ‘तुझा सूर्य उगवे आम्ही प्रकाशात न्हातो’, ‘तू आम्हा सांभाळ देवा’, ‘दयाघना’, ‘जगजेठी’, ‘हीच अमुची प्रार्थना, हेच अमुचे मागणे’ ही प्र्थानागीते श्रवणीय आहेत.

पद्मश्री पद्मजा फेणाणी यांचं ‘नमन माझे तू स्वीकारी’ हे शारदा प्रार्थनागीत आणि सध्या त्यांचा गाजत असलेला ‘तारक मंत्र’ ही अशीच सकारात्मक ऊर्जा देणारी लोकप्रिय प्रार्थना गीते. तारक मंत्र आणि अशा ध्वनीलहरींचा  अनेक रुग्णालयात उपचारासाठी केला जातो आहे, हे विज्ञानयुगातील वास्तव नाकारता येणार नाही. या गीतांमध्ये आणखी एका विलक्षण आशावादी आणि ओजस्वी गीताचा उल्लेख करायला हवा ते म्हणजे ज्येष्ठ गायिका आशाताई खाडिलकर यांनी शब्दबद्ध आणि स्वरबद्ध केलेल्या ‘जे जे उत्तम उदात्त उन्नत, तसे आम्हा व्हायचे’ या उत्तुंग संस्थेच्या ध्येय प्रार्थना गीताचा! आशाताईंच्या  तडफदार गायकीचं आणि ध्येयवादाचं थेट प्रतििबब या प्रार्थनागीतातून मनावर उमटतं.

आपल्या आयुष्याच्या प्रत्येक वळणावर वाट दाखवणाऱ्या या प्रार्थनागीतांचा विचार करू लागलं की वाटतं, लहान वयात म्हटलेले श्लोक, स्तोत्र, शाळेतील प्रार्थना रोज मनाला नकळत किती सतेज करत राहतात. मग वय वाढताना याचा विसर का पडू लागतो?  खरंतर ‘प्रार्थना’ हा शब्दच किती सात्त्विक  आहे. दात्याकडून प्रकर्षांने, आर्जवाने काही मागणे म्हणजे प्रार्थना. हृदय बुद्धी आणि कंठ या तिघांच्या एकरूपतेतून साकारणारं नादब्रह्म म्हणजे प्रार्थना! करुणा आणि माणुसकी जागवणारी ती प्रार्थना! निसर्गशक्तींशी संवाद साधण्याचं हे प्रभावी माध्यम! वेदकाळात समूहगान करून सर्वाचं मंगल व्हावं यासाठी प्रार्थना म्हणायची कल्पनाच किती अद्भूत होती. ऋषीमुनींच्या धीरगंभीर स्वरलहरींमधून, विश्व तेजाची आणि आदिशाक्तीची स्तुती करणाऱ्या या प्रार्थनेतून किती अलौकिक नादबह्म निर्माण होत असेल!

आज आवाजाच्या प्रदूषणाने या नादलहरींवर एक झाकोळ उभा केला आहे. विज्ञानाने उपलब्ध केलेल्या सोयी आणि सतत नवीन निर्माण झालं म्हणून ऐकत राहायचं, त्याच्यावर प्रतिक्रिया देतच राहायच्या या वेडापायी आपण मनाला ऊर्जा आणि सदैव प्रसन्नता देणाऱ्या या निर्झरांपासून अकारण दूर जातोय. सर्व प्रकारचं संगीत ऐकून झाल्यावर देखील मन तृप्त नाही झालं असं वाटलं ना, तर फक्त डोळे मिटून एक प्रार्थनागीत ऐका. ती तृप्ती, ती सुखद शांत संवेदना बहरून येईल.. कारण  निसर्गाशी आपली नाळ जोडली आहे ती या अशा सचेतन शब्द आणि नाद ब्रह्मानेच !!
कीर्ती आगाशे – response.lokprabha@expressindia.com
सौजन्य – लोकप्रभा