रिलायन्स जिओने बाजारात आपला फोन लाँच केल्यावर एकच खळबळ उडाली होती. ग्राहकांना या फोनच्या ऑनलाइन बुकिंगवर अक्षरशः उड्या पडल्या होत्या. त्यामुळे कंपनीने आपले बुकिंग काही काळासाठी थांबवले होते. मात्र आता कंपनीने पुन्हा एकदा आपल्या ग्राहकांना आनंदाची बातमी दिली आहे. रिलायन्स जिओचा फीचर फोन खरेदी करण्याची पुन्हा एकदा संधी ग्राहकांना मिळणार आहे. या फोनच्या दुसऱ्या फेजची प्री-बुकिंग दिवाळीनंतर सुरु होणार आहे. ‘पीटीआय’ने दिलेल्या वृत्तानुसार, दिवाळीनंतर पुन्हा एकदा जिओफोनची प्री बुकिंग वेबसाइट किंवा जवळच्या जिओ स्टोअरमध्ये करता येणार आहे.

या फेजमध्ये नोंदणी करण्यात आलेले फोन नोव्हेंबर महिन्यापर्यंत ग्राहकांना मिळण्याची शक्यता आहे. याआधी झालेल्या पहिल्या बुकिंगमधील फोनची सध्या डिलिव्हरी सुरु आहे. याआधी २४ ऑगस्ट रोजी जिओफोनच्या पहिल्या फेजमधील बुकिंग सुरु झाले होते. ज्यामध्ये पहिल्या तीन दिवसांतच लाखो लोकांनी प्री-बुकिंग केलं होतं.

या फोनसाठी दीड हजार रुपये डिपॉझिट घेण्यात येणार आहे. प्री-बुकिंगसाठी ५०० रुपये दिल्यानंतर उर्वरित हजार रुपये फोन डिलिव्हरीच्या वेळेस द्यावे लागणार आहेत. कंपनीच्या माहितीनुसार, हा फोन युजर्सने तीन वर्षे म्हणजेच ३६ महिने वापरल्यास ते दीड हजार रुपये त्याला परत देण्यात येणार आहेत.

जिओ फोनची वैशिष्ट्ये:

– जिओचा हा फोन ४ जी आहे.

– हा ‘भारतात, भारतीयांनी भारतीयांसाठी तयार केलेला फोन आहे’ असा कंपनीचा दावा आहे.

– जिओ फोनवरून ग्राहकांना १५३ रुपयांमध्ये महिनाभर ‘अनलिमिटेड डेटा’ वापरता येईल.

– आठवड्याला ५३ रुपये आणि २ दिवसांसाठी २३ रुपयांत ‘अनलिमिटेड डेटा’ असे मिनी प्लॅन्सही कंपनीने ग्राहकांना दिले आहेत.

– सर्व व्हॉइस कॉल मोफत असतील.