तळागाळात वैद्यकीय साधने पोहोचविण्यासाठी केंद्र प्रयत्नशील
सर्वसामान्यांना परवडतील अशा वैद्यकीय साधनांचे प्रदर्शन शुक्रवारी नवी दिल्लीत भरले होते. केंद्र सरकारच्या माध्यमातून हे प्रदर्शन भरविण्यात आले होते. त्यात रक्तातील ग्लुकोजची मात्रा मोजण्यासाठीचे यंत्र, हिमोग्लोबीनची पातळी माफक यंत्र, मलेरिया, डेंग्यू या आजारांचे निदान करणारी साधने यांचा समावेश होता. कमी खर्चीक वैद्यकीय साधनांना प्राधान्य देणार असल्याचा निर्धार केंद्र सरकारने यावेळी व्यक्त केला.
या साधनाची निर्मिती केंद्राच्या जैवतंत्रज्ञान विभागाने (डीबीटी) केली आहे. केंद्रीय विज्ञान-तंत्रज्ञान मंत्री हर्षवर्धन यावेळी उपस्थित होते. सद्यस्थितीत भारतीय आरोग्य तंत्रज्ञानाने आशिया खंडात चौथ्या स्थानावर झेप घेतली असून या माध्यमातून २०२५ पर्यंत २० अब्ज अमेरिकन डॉलरची उलाढाल होण्याचे भाकीतही त्यांनी वर्तविले.
आरोग्य सेवा आणि तंत्रज्ञान या क्षेत्रातील नवनवीन संकल्पना व संशोधनाला अनन्यसाधारण असे महत्त्व असून देशाच्या सामाजिक आणि आर्थिक प्रगतीलाही त्यामुळे वेग मिळतो. या नवकल्पनांचे फायदे हे तळागाळातील लोकांपर्यंत पोहचणे गरजेचे असल्याचे मत हर्षवर्धन यांनी यावेळी व्यक्त केले.
या वेळी प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या ‘एआयएनए’ उपकरणांचे प्रात्यक्षिक डीबीटीचे सचिव विजय राघवन यांनी सादर केले. हे उपकरण मोबाइलमध्ये बसविल्याने रक्तातील ग्लुकोज, स्निग्ध पदार्थ, क्रियेटिन आणि हिमोग्लोबिनची मात्राचे मोजमाप करणे सहजशक्य होते. यासाठी उपकरणात केवळ दहा रुपयांची एक स्ट्रिप टाकावी लागते. कंपनीकडे आतापर्यंत अशा २५ हजार स्ट्रिपची मागणी झाल्याची माहिती डीबीटीच्या वरिष्ठ सल्लागार आणि बायोटेक्नालॉजी इंडस्ट्री रिसर्च असिस्टन्ट कौन्सिल (बीआयआरएसी)च्या व्यवस्थापकीय संचालक रेणू स्वरूप यांनी दिली. अशाच स्वरूपाचे आणखीन एक उपकरण या प्रदर्शनात मांडण्यात आले आहे. ज्यामुळे प्राथमिक स्वरूपातील मलेरिया, डेंग्यू आणि विषमज्वरसारख्या आजारांचे निदान होणे शक्य आहे.
अपघातानंतर झालेल्या दुखापतीचे निदान करून रुग्णाला कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही, असे तंत्रज्ञानही विकसित केले गेले आहे. सध्या भारतात जवळपास १३ दक्षलक्ष अपघात घडतात, त्यापैकी ५ दक्षलक्ष अपघातांमध्ये पायाची दुखापत झाली आहे. या तंत्रज्ञानाकडून याबाबतची शाश्वती व्यक्त करताना रुग्ण दाखल झाल्यावर केलेल्या पहिल्या एक्स-रे आणि एमआरआयनंतर लगेच दुखापत झालेल्या पायावर उपचार केले जातात. हे जगातील एकमेव असे तंत्रज्ञान असून त्यांची किंमत केवळ २४९ रुपये असल्याचे हृदयरोगतज्ज्ञ प्रा. बलराम भार्गव यांनी सांगितले.

(टीप : ‘आरोग्यवार्ता’मधील बातम्या या जगभरातील संशोधकांनी केलेल्या वैद्यकीय संशोधनावर आधारित असतात. त्यामुळे त्यातील मतांशी ‘लोकसत्ता’चा संबंध नाही. कोणताही वैद्यकीय उपचार करण्यापूर्वी आरोग्यतज्ज्ञांशी व डॉक्टरांशी सल्लामसलत करणे आवश्यक आहे.)