News Flash

पावसाळ्यात गर्भवती महिलांनी घ्या ‘ही’ विशेष काळजी

पावसाळ्यात गरोदर स्त्रियांनी 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करु नका!

-डॉ. स्वाती गायकवाड
पावसाळा हा ऋतू प्रत्येकाला हवाहवासा वाटतो. पण एकदा पावसाला सुरुवात झाली की आपोआपच अनेक संसर्गजन्य आजारांना आमंत्रण मिळतं. या काळात अनेकांना आरोग्याविषयी लहान-सहान तक्रारी जाणवू लागतात. त्यामुळे पावसाळ्यात आरोग्याची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे. त्याबरोबरच या काळात वातावरणात गारवा निर्माण झाला असतो, त्यामुळे या दिवसांमध्ये गरोदर महिलांचीही विशेष काळजी घेतली पाहिजे.

मातृत्व हे प्रत्येक स्त्रीचं स्वप्न असतं. नऊ महिन्याचा हा कालावधी गर्भवती महिलेसाठी सुखद असला तरी या दरम्यान तिला स्वतःची आणि गर्भातील बाळाची विशेष काळजी घेणं खूप महत्त्वाचं असतं. या काळात अनेक महिलांना संसर्गजन्य आजारांची लागण होण्याची दाट शक्यता असते. तसं झाल्यास बाळाच्या आरोग्यावरही विपरित परिणाम होऊ शकतो. या चिंतेने अनेक महिला अस्वस्थ असतात. यासाठी आई व बाळाचे आरोग्य सुदृढ रहावे यासाठी गर्भवती महिलांनी पौष्टिक आहार घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यात डेंग्यू, मलेरिया, ताप, टायफॉइड, कॉलरा, सर्दी, खोकला यांसारखे आजार उद्भवतात. तसेच साथीचे आजारही होतात. गर्भवती महिलांना या आजारांचा संसर्ग होण्याचा धोका अधिक असतो. यामुळे गर्भातील बाळाच्या वाढीवरही याचा परिणाम होऊ शकतो. हे आजार टाळण्यासाठी गर्भवती महिलांना आरोग्याची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे.

पावसाळ्यात गरोदर महिलांनी घ्या ही काळजी

१. वैयक्तिक स्वच्छता ठेवा –

कोणत्याही आजाराला आपल्यापासून लांब ठेवायचं असेल तर स्वच्छता बाळगणं हा महत्त्वाचा उपाय आहे. त्यामुळे कधीही बाहेरुन आल्यानंतर स्वच्छ हातपाय धुवावेत. तसंच स्वयंपाक करताना, जेवतानाही हात धुवावेत.

२. घराबाहेरील परिसर स्वच्छ ठेवा –

आपला परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करा. तलावाजवळ, जमिनीत कुंड्यांमध्ये पाणी साचू देऊ नका. या पाण्यामध्ये डासांची उत्पत्ती होते. यामुळे मलेरिया किंवा डेंग्यू यांसारखे आजार उद्भवू शकतात.

३. जखम झाल्यास वेळीच लक्ष द्या –

एखादं काम करताना अनेक वेळा महिलांना लागत, खूपतं किंवा हात वगैरे भाजी चिरताना कापतात. तर अशा वेळी जखम झाल्यास त्याकडे त्वरीत लक्ष द्या. जखम कोरडी ठेवायचा प्रयत्न करा आणि वेळीच डॉक्टरांची भेट घ्या. कारण खुल्या जखमांवर जंतू लवकर जमा होतात.

४. वारंवार पाणी प्या –

पाणी पिणे हे शरीरासाठी कधीही फायदेशीर असतं. त्यामुळे मुबलक प्रमाणात पाणी प्या. शक्यतो या काळात पाणी उकळून, गाळून प्या. तसंच जेवताना कोमट पाणी प्या.

५. बाहेरील खाद्यपदार्थ टाळा –

पावसाळ्यात साथीचे आणि संसर्गजन्य आजार होण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे बाहेर रस्त्याकडेला मिळणारे खाद्यपदार्थ खाणं टाळा. तसेच बाहेरील पाणीही पिणं टाळा. शक्यतो पाणी उकळून प्या.

६. पौष्टिक आहार घ्या –

रोगप्रतिकार शक्ती वाढविण्यासाठी पौष्टिक आहाराचे सेवन करा. ब्रोकोली, गाजर, हळद आणि आले यांचा आहारात समावेश करा. खोकला झाल्यास हळद गुणकारी ठरते. तर सर्दी झाल्यास लसूण फायदेशीर ठरतो. त्यामुळे घरच्या घरी विविध भाज्यांचे सूप करुन त्यात हळद आणि लसणाचा वापर करा.

याकडे दुर्लक्ष करु नका-

१. गर्भवती महिलांनी पावसाळ्यात शक्यतो घराबाहेर जाणे टाळा.

२. या काळात सतत जमीन ओली असते. त्यामुळे पाय सांभाळून टाळा. शक्यतो एकट्याने बाहेर जाऊ नका. सोबत घरातील व्यक्ती असू द्या.

३. मजल्यावरील रबर मॅट्स असतील तर जपून पावले टाका.

४. पावसाच्या पाण्याने गुळगुळीत झालेला पृष्ठभाग टाळा.

५. रबर- सोल्डसह शूज घाला आणि लेदरच्या शूजला नको म्हणा.

६. पायांना आराम मिळेल अशा चपला घाला.

७. पायर्‍या चढताना किंवा खाली उतरताना पकडून उतरा.

८. पावसाळ्यात फ्रिजमधील थंड पाणी पिणे शक्यतो टाळावेत.

( लेखिका डॉ. स्वाती गायकवाड खराडी, पुणे येथील मदरहूड हॉस्पिटलमध्ये सल्लागार प्रसूती व स्त्रीरोग तज्ज्ञ आहेत.)

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 18, 2020 5:10 pm

Web Title: pregnant women should take special care during monsoon ssj 93
Next Stories
1 बहुगुणी आवळा! जाणून घ्या फायदे
2 कसा आहे सॅमसंगचा लेटेस्ट Galaxy A21s ?,’रेडमी नोट 9 प्रो’ला देणार टक्कर
3 जिओसाठी आनंदाची बातमी… पुढील तीन वर्षांत घेणार गरुडझेप; ग्राहकांचा आकडा वाचून व्हाल थक्क
Just Now!
X